आदिवासी विकासयोजनांच्या कामांंचा आढावा

योजना न्यूक्लिअस बजेटमध्ये घ्या : आ. पवार
आदिवासी विकासयोजनांच्या कामांंचा आढावा

कळवण । प्रतिनिधी Kalwan

शैक्षणिक वर्षात शालेय व वसतिगृह प्रवेशापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करा. आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा (Schemes of Tribal Development Department) खर्‍या अर्थाने लाभ होईल, अशा योजनांचा न्यूक्लिअस बजेटमध्ये समावेश करा अशी सूचना कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष आमदार नितीन पवार ( MLA Nitin Pawar )यांनी केली.

कळवण प्रकल्पस्तरीय समितीअंतर्गत आदिवासी उपयोजनेतील विविध विकासकामांचा आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी समितीचे अध्यक्ष आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुरगाणा तालुक्यातील आंबूपाडा शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनींची पटसंख्या चांगली आहे. वसतिगृह नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.शासकीय वसतिगृहाबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची आंबूपाड्यात आवश्यकता आहे.

शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या असतांना यंत्रणेने टाळाटाळ केली. पळसन, माणी येथील प्रस्ताव मंजूर होतात. मग आंबूपाड्याची अडचण काय असा सवाल करीत आमदार नितीन पवार यांनी यंत्रणेला खडे बोल सुनावले. विकासकामासंदर्भात टाळाटाळ केल्यास यंत्रणेविरोधात आंदोलन करण्याचा थेट इशाराच बैठकीत दिला. न्यूक्लिअस बजेटमधून आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शाळेद्वारे जातीचा दाखला देण्यासंदर्भात व रेशनकार्डसाठी आदिवासींची पिळवणूक थांबविण्यासाठी गावोगावी शिबिर घेऊन न्यूक्लिअस बजेटमधून रेशनकार्ड देण्यासंदर्भात योजना तयार करुन अंमलबजावणी करण्याची सूचना आमदार पवार यांनी बैठकीत दिली.

सध्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित इंग्लिश मीडियम शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक होईल, जनतेला आर्थिक झळ बसेल, शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी बैठकीत दिल्या. रोजदारी कर्मचारी नेमणूक करतांना स्थानिकांना न्याय देतांना कला, क्रीडा, संगणक शिक्षकांचा कार्यकाळ संपला असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवून कळवण सुरगाण्यातील स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्याची सूचना आमदार पवारांनी बैठकीत केली.

शिलाई मशीन, बचतगटांना सामूहिक शेती, शेती उपयोगी अवजारे, भजनी साहित्य, गावभांडी, मंडप, आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शेतकर्‍यांना मार्गदर्शन शाळा यासारख्या आदिवासी बांधवांच्या हिताची जोपासना करणार्‍या योजना न्यूक्लिअस बजेटच्या राबवण्याची सूचना आमदार पवारांनी दिली. शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग उखळ पांढरे करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून दुरुस्तीच्या नावाखाली थातूरमातूर कामे दाखवून बिले काढण्याचा सपाटा चालवला आहे अशा तक्रारी प्राप्त झाल्या असून, यंत्रणेने कामकाजात सुधारणा करावी अशी सूचना आमदार पवारांनी यावेळी दिली.

शासकीय आश्रमशाळामधील विद्यार्थी प्रवेश वाढीसाठी प्रयत्न करा, प्रकल्प कार्यालयात विविध योजनांना विकासकामासाठी येणारा निधी मागील काळात मोठ्या प्रमाणात परत गेला आहे. निधी परत जाणार नाही याची काळजी घ्या. वेळेत काम न करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर पुढील काळात कारवाई करण्याचे पाऊले उचलले जाऊन प्रकल्प समितीचा अहवाल शासनाला सादर करण्याचा इशारा आमदार पवारांनी बैठकीत दिला. यावेळी समितीचे सदस्य राजू पवार यांच्यासह प्रकल्पधिकारीसह तहसीलदार बी ए कापसे व प्रकल्पातील सर्व विभागप्रमुख, खातेप्रमुख उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com