जिल्ह्यातील अतिवृष्टीत नुकसानीबाबतचा आढावा

जुलैतील मुसळधारेने सिंचन, पिण्याचा पाणीप्रश्न सुटला
जिल्ह्यातील अतिवृष्टीत नुकसानीबाबतचा आढावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy Rain )सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रश्न सुटला तरी देखील या हाहाकार माजवणार्‍या अतिवृष्टीने ग्रामीण भागातील बंधारे व पाझरतलाव तसेच पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

यामध्ये काही ठिकाणी पुलच वाहून गेला आहे तर काही ठिकाणी बंधारे आणि तलावांना भगदाड पडले आहे तर काही ठिकाणी तडे गेले असल्याची नोंद आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण साधारणपणे सव्वातीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. संबंधित नुकसानीबाबत आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांना पावसाने यंदा अक्षरशः झोडपून काढले. सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथे तलाव फुटून संपूर्ण गावात पाणी शिरले. यामध्ये नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याची घटनाही घडली. काही ठिकाणी पाझर तलावांना तडे पडून त्यातून पाण्याची गळती झाली. नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोर्‍या, पूल पाण्याखाली गेले. गावाच्या वेशीवर व डोंगर, टेकड्यांच्या पायथ्याशी बांधलेल्या तलाव, बंधार्‍यांमध्ये पाण्याचा लोढा वाढून ते फुटले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावोगावच्या पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने तलाव, पाझर तलाव, नदी, नाल्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. उन्हाळ्यात कोरडे पडणारे हे बंधारे पावसाळ्यात पाण्याने पूर्णपणे भरतात. त्यानंतर त्यांना फळ्या बसवून त्यांचा विसर्ग रोखला जातो. तत्पूर्वी बंधारा भरल्यानंतर त्यातील पाणी विशिष्ट पातळीपर्यंत सोडून दिले जाते. यंदा मात्र जुलै महिन्याच्या दहा ते बारा दिवसांतच सर्वदूर अतिवृष्टी झाली.

सर्वाधिक नुकसान पेठमध्ये

जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 29 बंधारे, तलावांचे सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज लघु पाटबंधारे विभागाने काढला आहे. त्यात सर्वाधिक नुकसान पेठ तालुक्यातील 8 बंधार्‍यांचे झाले असून, त्याखालोखाल कळवण 7, सुरगाणा 6, दिंडोरी 3, चांदवड 2, निफाड, मालेगावला प्रत्येकी एक अशा बंधार्‍यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com