
नाशिकरोड । Nashikroad (प्रतिनिधी)
आठ महिन्यांपासून लॉकडाउन असतानाही कैद्यांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला या आर्थिक वर्षात 4 कोटी 37 लाखांचा महसूल मिळवून दिला. करोना काळ व कमी मनुष्यबळ असतानाही उत्पन्नाबाबत हे कारागृह राज्यात दुसरे आले.
कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम यांनी ही माहिती दिली. नाशिकरोड कारागृहामध्ये एकही करोना रुग्ण नाही. त्याबाबत येथील कारागृह राज्यात प्रथम आहे.
राज्यात 60 जेल असून मार्च 19 पर्यंत 36 हजार 366 कैदी होते. पैकी साडेपाच हजार पक्क्या कैद्यांना रोजगार देण्यात आला. कारागृहांमधील शेती व उद्योगाव्दारे राज्य कारागृह विभागाने यंदा 27 कोटींचे उत्पादन घेतले.
त्यातून सव्वा दोन कोटी निव्वळ नफा मिळाला. नाशिकरोड कारागृहात अडीच हजार कैदी असून पक्क्या कैद्यांना वीणकाम, सुतारकाम, शिवणकाम, चर्मकला, बेकरी, लोहकाम, धोबीकाम, रसायन, मूर्तीकाम या नऊ कारखान्यांतून रोजगार मिळतो.
यासाठी प्रशांत पाटील, अमोल बागूल, भगवान महाले, शाम देशपांडे, संदीप काकळीज, विठ्ठल गायकवाड हे कारखाना अधिकारी-कर्मचारी झटतात. यंदा लोहकाम कारखान्याने 1 कोटी 68 लाखासह प्रथम तर सुतारकाम कारखान्याने एक कोटी उत्पनासह दुसरा क्रमांक मिळवला.
उत्पन्नाच्या बाबतीत येरवड्यानंतर नाशिक जेलचा राज्यात दुसरा क्रमांक आला. करोनाचा नसता तर नेहमीप्रमाणे नाशिकने प्रथम क्रमांक मिळवला असता.
नाशिकरोड कारागृहाला 2013-14 साली 2 कोटी 45 लाख महसूल मिळाला होता. तेव्हापासून तो वाढत गेला. 2017-18 साली साडेसहा कोटींचा विक्रमी महसूल मिळाला. 2018-19 ला महसूल 5 कोटी 38 लाख होता. यंदा तो एक कोटींनी कमी आहे. कारण करोना टाळण्यासाठी हायकोर्टाने राज्यातील जेलमधून काही बंद्यांच्या मुक्ततेचे व काहींना रजा देण्याचे आदेश दिले. नाशिकरोडचे चारशे कुशल बंदी सुटल्याने महसूलाला मोठा फटका बसला.
महत्वाचे पैठणीचे व अन्य काम रेंगाळली. चाळीस लाखांवर उत्पन्न देणारी शेतीही मागे पडली. गळाभेट, फोन कॉलिंग, शिक्षण, आरोग्य, चांगले जेवण आदी सुविधांमुळे कैदी प्रेरीत होऊन काम करत आहेत.
लंडनच्या राधास्वामी सत्संग मंडळाने नाशिक जेलच्या दर्जेदार सतरंज्या नेल्या होत्या. आता पुन्हा मागणी आहे. अमेरिकेतही सतरंज्या गेल्या असून आणखी ऑर्डर मिळणार आहे. यंदा राज्यातील पोलिस व जेलची पाच हजार सतरंज्यांची तर अमरावती कोर्टाची 86 लाखांच्या फर्निचरची ऑर्डर आहे. राज्यातील जेलना येथून सहा महिन्याला कपड्याचे व अंगाचे तीस हजारावर साबण तसेच आठशे लीटर फिनाईल पुरविण्यात येते.
या जेलने तब्बल एक लाख मास्क विकले. जिल्हा रुग्णालय, बँका, संदर्भ रुग्णालय, नाशिकरोड प्रेस तसेच राज्यातील जेल व रेल्वेला हे मास्क देण्यात आले. हे जेल 2003 पासून राज्यातील पोलिसांना पेट्या पुरवते. यंदा 40 हजाराची ऑर्डर आहे. मच्छरदाण्याही दिल्या जातात.
राज्य समाज कल्याण विभागासाठी 2300 बेंच आणि पलंगाचे काम सुरु आहे. अन्य जेलना स्वयंपाकाची नवी भांडी, भाज्या येथून जातात. नाशिक जेल महाबीजला बियाणे पुरवते.