
नाशिक । प्रतिनिधी Nashik
पुढील वर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत.या वर्षअखेेरीस महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे नाशिकच्या भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी पदाधिका़र्यांच्या बाहुत बळ भरण्याचा प्रयत्न करुन त्याचा श्री गणेशा केला आहे.
भाजपने पुन्हा मिशन 45 ची घोषणा केली आहे. राज्यातून 48 खासदार निवडून जातात. सध्या भाजपकडे 23 खासदार आहेत. भाजपला केंद्रात पुन्हा सत्तेवर यायचे असल्यास महाराष्ट्रातून किमान 40 जागांचे बळ भाजपला हवे आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचे स्वप्न पाहायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदारांची कुमक भाजपला हवी आहे. त्यामुळे मिशन 45 अशी घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात विधानसभा निवडणुका देखील आगामी काळात होणार असल्याने या निवडणुकांसाठी भाजपकडून मिशन 200 चा नारा देण्यात आला आहे.
महापालिकेत पुन्हा सत्ता राखण्यासाठी आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रखर भूमिका घेतली आहे. गेल्याच आठवड्यात विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन भाजपा पदाधिकारी काम घेऊन आल्यास ते प्राधान्याने करा.विरोधकांना दाद देऊ नका, असा संदेश दिला.जे आडवे येतील त्यांना न जुमानता काम करा.मी तुमच्या पाठीशी आहे, असे जाहीर करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे.गेल्या सात वर्षात पहिल्यांदा भाजपा पदाधिका़र्यांना बरोबर घेऊन मंत्री कामाला लागल्याने आगामी काळात भाजपचा वेगळा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.
त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 900 पदाधिकार्यांची जम्बो कार्यकारिणी घोषित केली. यामध्ये सोळा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, 16 चिटणीस, 64 कार्यकारिणी सदस्य, 264 विशेष निमंत्रित सदस्य आणि 512 निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीमध्ये सदस्यपदी लक्ष्मण सावजी, शंकर वाघ, अशोक व्यवहारे, दादाजी जाधव, तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, बाळासाहेब सानप, विठ्ठल चाटे, अमृता पवार, तनुजा घोलप यांना संधी देण्यात आली आहे.
निमंत्रित सदस्य माजी महापौर सतीश कुलकर्णी, डॉ.निशिगंधा मोगल, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदीप पेशकार, विजय साने, अजिंक्य साने, अलका अहिरे, मनीषा पवार, डॉ. प्रशांत पाटील, आशिष नहार, एन.डी.गावित, दादाराव जाधव, सोपान दरेकर, बिंदूशेठ शर्मा, मनोज दिवटे, योगेश माईंद, माधुरी पठार पालवे, महेश श्रीश्रीमाळ, स्मिता मुठे, शंकर वाघ, महेश मुळे, रोहिणी वानखेडे, रवींद्र अमृतकर, सुनील वाघ, डॉ. संध्याताई तोडकर, गोविंद बोरसे, नितीन पोफळे, बापूसाहेब पाटील, अनिकेत पाटील, सतीश मोरे, सुरेश निकम, प्रवीण अलई, डॉ. वैभव महाले, तुषार भोसले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकार्यांना राज्यपातळीवर काम करण्याची ंसंधी प्रथमच मिळाली आहे. आता हे पदाधिकारी संधीचा उपयोग कसा करुन दाखवतात यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.