व्हेंटिलेटर परत द्या, अन्यथा आंदोलन

व्हेंटिलेटर परत द्या, अन्यथा आंदोलन

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

करोना विषाणूचे संक्रमण वाढत असल्याने रुग्ण संख्या दोन हजारांच्या जवळपास गेली आहे.करोनामुळे आतापर्यंत 59 जणांचा बळी गेल्याने निफाड तालुक्यासाठी राज्य शासनाकडून आलेले चार व्हेंटिलेटर हे तांत्रिक कारण देत लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटर येथून पिंपळगाव बसवंत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे .चार दिवसात पुन्हा कार्यान्वित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जि.प. सदस्य डी.के. जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी दिला आहे.

तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्ण उपचार घेत असतात. मात्र आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे लासलगाव कोविड सेंटरला मिळालेली व्हेंटिलेटर हे एमडी वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण देत सदरचे व्हेंटिलेटर हे पिंपळगाव बसवंत येथे पाठविण्यात आल्याचा प्रकार लासलगाव मध्ये घडला आहे.

सध्या करोनाचे थैमान सुरू असून सध्या तालुका करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. एकीकडे शहरी भागात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात कोणाचे जीव जाऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून लासलगाव कोविड केअर सेंटर येथे दीड महिन्यापूर्वी 16 लाख रुपये किमतीचे चार व्हेंटिलेटर देण्यात आले होते.

संबंधित कंपनीकडून या चारही व्हेंटिलेटर वापरण्या संदर्भात लासलगाव येथील आरोग्य टीमला डेमो देण्यात आला होता. मात्र हे व्हेंटिलेटर कार्यन्वित न करता मेस्मा कायदा राज्यात लागू असतांनाही लासलगाव येथे तीन एमडी मेडिसिन डॉक्टर असून सुद्धा डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करत हे व्हेंटिलेटर परत केले असल्याची बाब भाजप निवेदनाने समोर आली आहे.

त्यामुळे सदर व्हेंटिलेटर आणि डॉक्टरांची टीम उपलब्ध करुन देण्याची मागणी जि.प. सदस्य डी.के. जगताप, प्रकाश दायमा, योगेश पाटील, राजेंद्र चाफेकर, रवी होळकर, बापू लचके, मनोज भावसार, संतोष पवार आदींसह भाजप पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com