निफाड तालुक्यात उसतोड मजुरांची घरवापसी

निफाड तालुक्यात उसतोड मजुरांची घरवापसी

निफाड। Niphad

कन्नड, नांदगाव, चाळीसगाव, परभणी आदी भागातून ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगारांना आता गावाची ओढ लागल्याने बैलगाडीतून आपल्या कुटुंबासह हे मजूर गावांकडे परतू लागले असून तालुक्यातील रस्त्यावर समुहाने जाणार्‍या बैलगाड्यांचे दृश्य सध्या पहावयास मिळत आहे.

एकेकाळी साखर सम्राटांचा तालुका म्हणून निफाडची ओळख होती. दोन-दोन कारखाने चालवून देखील ऊस शिल्लक राहत असे. परंतु गेल्या काही वर्षापासून सहकाराचा स्वाहाकार झाल्याने तालुक्यातील तिनही साखर कारखाने बंद पडले. गुर्‍हाळे देखील नामशेष झाली. मात्र ऊसाचे क्षेत्र काही घटले नाही. आजही गोदाकाठ परिसरातील शेतकर्‍यांचे ऊस हेच नगदी पिक आहे.

परिणामी या शेतकर्‍यांना आपला ऊस कोळपेवाडी, कोपरगाव, कादवा, संगमनेर, द्वारकााधिश, प्रवरा, लोणी या कारखान्यांना द्यावा लागत आहे. तालुक्याच्या गोदाकाठ भागात ऊसाचे मुबलक क्षेत्र असल्याने वरील कारखान्यांचे ऊसतोडणी कामगार नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत गोदाकाठच्या प्रत्येक गावाच्या शिवारात स्थायिक होतात. या काळात या कामगारांच्या आगमनाने गावे गजबजून जातात.

तब्बल 6 ते 7 महिने या भागात ऊस तोडणी केल्यानंतर व कारखान्याचा गाळप हंगाम संपण्याच्या स्थितीत आल्यानंतर हे कामगार आपल्या कुटुंबासह गावाकडे परतू लागतात. तोडलेल्या ऊस बांडीवर कुटुंबाचा गाडा चालवायचा अन् तोडलेल्या ऊसाचे टनाप्रमाणे कारखान्यांकडून पैसे घ्यायचे. यातही दलाली आलीच. कारखान्याचे करार जे मुकादम करतात ते या कामगारांना आगावू पैसे देतात. परिणामी तोडलेल्या ऊस टनामधून त्यांचे पैसे कपात केले जातात. त्यामुळे जी काही थोडीफार रक्कम मिळेल त्यावर घरगाडा चालवायचा असा हा या मजुरांचा दिनक्रम.

गावी पाणीटंचाई असल्याने शेतात काही पिकत नाही. त्यामुळे शेती ही पडणार्‍या पावसावरच अवलंबून. साहजिकच पावसाळ्यानंतर हाताला काम नाही. त्यामुळे हे कामगार ऊस तोडणीसाठी शेकडो कि.मी. चा प्रवास करत कुटुंबासह इकडे येतात. त्यामुळे दरवर्षी दिवाळीपासून ते मार्च, एप्रिल पर्यंत हा परिसर मजुरांनी गजबजलेला असतो. मात्र आता पावसाळ्याची चाहूल लागण्यापुर्वी शेतीची मशागत करावी यासाठी हे मजूर गावाकडे परतू लागले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com