Blog : रेटायनल डिटॅचमेंट (नेत्रपटल सरकणे)

Blog : रेटायनल डिटॅचमेंट (नेत्रपटल सरकणे)

डोळा कॅमेऱ्याप्रमाणे काम करतो. कॅमेऱ्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म्वर पडते व फोटो निघतो. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेऱ्याची फिल्मच आहे. या नेत्रपटलावारिल मॅक्युला हा टाचणीच्या डोक्याएवढा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. नेत्रपतालाच्या इतर भागंपेक्षा अनेकपटीनी अधिक. आपण जेव्हा एखादया वस्तूकडे पहातो तेंव्हा डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर (रेटिना) फोकस केले जातात. नेत्रपटलावर  समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते आणि दृष्टिचेतेद्वारे मेंदुकडे पोहोचवली जाते.

निरोगी नेत्रपटल डोळ्याच्या मागील भागात अलगद चिटकले असते . भिंग (लेन्स) व नेत्रपटल यामधील जागा व्हीटरिअस नावाच्या जेलिसरख्या पदार्थाने व्यापलेली असते. व्हीटरिअस नेत्रपटलाला काही ठिकाणी घट्ट चिकटलेले असते. नेत्रपटल जेव्हा जागेवरून सुटून येते, तेव्हा त्याचे कार्य होऊ शकत नाही.यालाच रेटायनल डिटॅचमेंट असे म्हणतात. नजर वाचविण्यासाठी नेत्रपटल लवकरात लवकर पूर्ववत जागेवर बसविणे अत्यावश्यक असते. त्यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.

वाढत्या वयाप्रमाणे व्हीटरिअसचे जेलिपासून पाण्यासारख्या पदार्थात रूपांतर होते. एका विशिष्ट वेळी व्हीटरिअस नेत्रपटलापासून सुटून येते, याला पोस्टिरियर व्हीटरिअस डिटॅचमेंट (पि. व्ही. डी) असे म्हणतात. जवळ जवळ १००% लोकांमध्ये चाळिशी किवा पन्नशिमध्ये ही प्रक्रिया होते. P.V.D नंतर रुग्णांना डोळ्यासमोर अचानक काळे बिंदू फिरताना दिसू लागतात. याला फ्लोटर्स असे म्हणतात. काही रुग्णांना वीज चमकल्याप्रमाणे आभास होतो. व्हीटरिअस चा नेत्रपटलावर ताण आल्यामुळे असे जाणवते.

बव्हतांशी लोकांमध्ये P.V.D  नंतर नेत्रपटलाला इजा होत नाही. परंतु काही रुग्णांमध्ये नेत्रपटलावरचा ताण जास्त असल्याने नेत्रपटलाला भोक पडते. याला हॉर्स शू टेअर किवा रेटीनल होल असे म्हणतात. काही रुग्णांमध्ये नेत्रपटलात कमकुवत जागा असतात. त्याला सहसा लाटिस डीजेनेरशन असे म्हणले जाते. अशा कमकुवत जागी नेत्रपटलात छिद्र पडण्याची शक्यता जास्त असते. वेळीच लक्षात न आल्यास आजार पराकोटीला जाऊन नेत्रपटल जागेवरून सरकते. म्हणजेच रेटीनल डिटॅचमेंट होते. वृध्दत्व, ह्स्वदृष्टी, डोळ्यावरील शस्त्रक्रिया, डोळ्याला गंभीर इजा होणे हे काही रिस्क फॅक्टर आहेत.

रेटीनल डिटॅचमेंट सुरू होताना डोळ्यासमोर काळा पडदा पडल्यासारखं वाटते. जसजसा आजार वाढतो, तसतशी नजर कमी होत जाते. लवकर शस्त्रक्रिया न केल्यास नजर परत येवू शकत नाही.

उपचार पद्धती 

लेसर: नेत्रपटलास पडलेले छिद्र रेटीनल डिटॅचमेंट होण्याअगोदर दिसून आले, तर लेसर किरणांनी त्याच्या सभोवतालचे नेत्रपटल घट्ट करता येते. त्यामुळे रेटिनाल डिटॅचमेंट होण्याची शक्यता बरीच कमी होते. लाटिस डीजेनेरशनच्या भागालासुद्धा लेसर किरण द्यावे लागू शकतात. लेसर उपचारांनी रेटीनल डिटॅचमेंट होण्याची शक्यता बरीच कमी होते मात्र काही प्रमाणात हि रिस्क राहतेच.

लेसर उपचार करण्यासाठी आजार लवकरात लवकर लक्षात येणे अत्यावश्यक असते. लेसर उपचार करण्यासाठी केवळ काही मिनिटांचा कालावधी लागतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारची भुल देण्याची गरज नसते.

न्यूमाटिक रेटिनोपेक्सी: काही विशिष्ट रुग्णांमध्ये डोळ्याच्या आत हवेचा बुडबुडा सोडला जातो. या हवेच्या प्रेशरने नेत्रपटल जागेवर ढकलले जाते. ते तसे टिकावे म्हणून क्रायो प्रक्रिया केली जाते. केवळ काही विशिष्ट प्रकारच्या रेटीनल डिटॅचमेंटमध्येच ही शस्त्रक्रिया करता येवू शकते.

स्क्लेरल बक्कल: या शस्त्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी नेत्रपटलास भोक पडले असते, त्याच्या बाहेरील बाजूस सिलिकॉन रबरचा तुकडा शिवला जातो. यामुळे डोळ्याचे बाहेरील थर आतील बाजूस ढकलले जातात. त्याचबरोबर नेत्रपटलाखली जमा झालेले पाणी बाहेर काढून टाकले जाते. त्यामुळे नेत्रपटल पूर्ववत जागेवर जाऊन बसते.

व्हीटरेक्टोमी: या शस्त्रक्रियेमध्ये, बुबुळाच्या बाजूला छोटी छिद्रे पाडून त्यात पातळ पेन्सिलसरखी यंत्र डोळ्याच्या आतमध्ये घातली जातात. नेत्रपटलावर ताण आणणारे व्हीटरिअस पूर्णतया काढून टाकले जाते. नेत्रपटल जागेवर बसवून, ते तसे टिकावे यासाठी लेसर उपचार केले जातात. लेसर चा परिणाम येईपर्यंत नेत्रपटल जागेवर टिकावे यासाठी डोळ्याच्या आतमध्ये सिलिकॉन ऑईल किवा गॅस भरला जातो. सिलिकॉन ऑईल भरल्यास ते ३ ते ४ महिन्यांनी दुसरी छोटी शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागते. गॅस भरलेला असल्यास तो हळूहळू (४ ते ६ आठवड्यात) कमी होतो. परंतु गॅस डोळ्यात असेपर्यंत नजर अंधुक असते.

अनेक रुग्णांमध्ये यासर्व पद्धती एकत्र कराव्या लागतात.

शस्त्रक्रियेचा मुख्य हेतू नेत्रपटल जागेवर बसवणे हा आहे. त्यानंतर येणारी नजर ही नेत्रपटलात असलेल्या शक्तीवर अवलंबून असते. रेटायनल डिटॅचमेंट शस्त्रक्रियेनंतर येणारी नजर मोतीबिंदू च्या शस्त्रक्रियेनंतर येणाऱ्या नजरेसारखी नसते. जसजसा शस्त्रक्रियेस उशीर होत जातो, तसतसे नेत्रपटल अधिकाधिक कमकुवत होते व रुग्णास नजर येण्याची शक्यता कमी कमी होत जाते. म्हणूनच ही शस्त्रक्रिया इमेर्जन्सी तत्वावर केली जाते.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर ३ ते ४ तासात रुग्णांना घरी जाता येते. त्यानंतर ३ आठवडे डोके खाली घालून झोपण्याचा अथवा बसण्याचा व्यायाम करावा लागतो. या कालावधी नंतर घरातील कामे सुरू करता येतात. परंतु कमरेखाली वाकणे, जड वजन उचलणे किंवा जास्त व्यायाम करणे टाळावे.

अत्याधुनिक शस्त्रक्रियेने या गंभीर आजाराचा उत्तम इलाज करता येतो. परंतु काही रुग्णांमध्ये नेत्रपटल आक्रसून येते व जागेवरून पुन्हा सुटू शकते. या रुग्णांमध्ये पुन्हा शस्त्रक्रिया करून नेत्रपटल जागेवर बसवावे लागते. प्राथमिक शस्त्रक्रिया लवकरात लवकर केल्यास हे होण्याची शक्यता कमी होते. या शत्रक्रियेनंतर रुग्णांनी वारंवार डोळ्याची तपासणी करणे, डोळ्याचे प्रेशर चेक करणे अत्यावश्यक आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com