
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या ( Corona )प्रादुर्भावामुळे सर्वत्र निर्बंध लागू झाले होते. त्यामुळे बहुतांशी उद्याने, मैदान व जॉगिंग ट्रॅक बंद होते. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल (Restrictions relaxed )करण्यात आले. मात्र तरीही शहरातील अनेक उद्याने ( Gardens ) अद्यापही बंद असून ते केव्हा उघडणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षापासून अनेक व्यवसाय बंद होते. तसेच ज्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने अशा ठिकाणांवर बंधन आले होते. यात प्रामुख्याने उद्यानांचा समावेश होता. गेल्याच महिन्यात राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील निर्बंध हटविले. त्यामुळे सर्व ठिकाणचे व्यवसाय सुरू झाले. मात्र उद्याने कधी खुली करणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
प्रामुख्याने नाशिकरोडच्या उद्यानांत उन्हाळी सुटीत दरवर्षी मोठी गर्दी होत असते. शिवाय उद्यानाबाहेर हातावर पोट भरणारे व्यावसायिक आपला व्यवसाय करत असल्याने त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होते. येथील मुक्तिधामला भेट देण्यासाठी शहरासह राज्यातील अनेक भागातून पर्यटक येत असतात. मुक्तिधामच्या शेजारी असलेल्या सोमाणी उद्यानात आबालवृद्धांची मोठी गर्दी असते.
सायंकाळच्या वेळी नागरिकही आपल्या मुलांना घेऊन उद्यानामध्ये येतात. परंतु सध्या त्यांच्या आनंदावर पाणी फिरत आहे. उद्यान बंद असल्याने बच्चे कंपनीला खेळण्यासाठी जागा नाही. याशिवाय जेलरोडच्या रहिवासी भागातील अनेक छोटे मोठे उद्याने बंद असल्याने हे उद्याने केव्हा खुले होणार, असा सवाल नागरिक व पर्यटक करत आहे.