निर्बंध शिथिल, पोलीस बंदोबस्त कायम

विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर होणार कारवाई
निर्बंध शिथिल, पोलीस बंदोबस्त कायम

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला कडक लॉकडाऊन निर्बंधांमध्ये 23 पासून शिथिलता येणार आहे. मात्र असे असले तरी शहर तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस बंदोबस्त व कारवाई कायम राहणार आहे. करोना नियम न पाळणारे, विनाकारण फिरणारे तसेच उभे राहणारांना पोलिसांकडून दंडुक्यांचा प्रसाद मिळत राहणार आहे. यामुळे विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

करोनाचा वाढता प्रसार, तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका आणि लसीकरणातील अनियमितता या सर्व बाबी सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 12 ते 22 या दहा दिवसांसाठी कडक निर्बंधाच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. या दहा दिवसात दुसर्‍या लाटेतील करोनाची साखळी पूर्णत: तोडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली याचा चांगला लाभ झाल्याचे जिल्हाभरात चित्र आहे. यासाठी पूर्वीपेक्षा नियम अधिक कठोर करण्यात आले होते, नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी शहर तसेच ग्रामीण पोलिसांकडे सोपविण्यात आली होती.

नाशिक शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर 40 नाकाबंदी पाँईट्स लावण्यात आले होते. या दहा दिवसात या नाक्यांवर बहुतांश वाहने अडवून कडक तपाणी करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणार्‍या नागरिकांनाच यातून सुटका होत होती. वैद्यकीय कारण वगळता इतर सर्व कारणांसाठी फिरणारांवर तसेच दूध तसेच भाजीपाला विक्री करणारांवरही पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणांवरून जिल्ह्यात येणार्‍या सर्व 8 मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे 15 तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. याबरोबरच त्या त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्ती पथके कार्यरत राहणार करण्यात आली होती. याच्या परिणामी ई पास असल्याशिवाय तसेच सबळ कारण असल्याशिवाय जिल्ह्यात अनेकांना परवानगी नाकारण्यात येऊन अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या ठिकाणांवरून वाहतूक वाढून धोका वाढू नये यासाठी हे बंदोबस्त तसेच ठेवण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाचे निर्बंध शिथिल झाले तरी राज्य शासनाने घोषित केलेले निर्बंध 1 जून पर्यंत लागू राहणार आहेत. यामुळे पोलीस प्रशासन सुरू असलेली कारवाई 1 जूनपर्यंत कायम ठेवणार असल्याचे पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाले असले तरी इतर जिल्हे तसेच इतर राज्यातून होणारी वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा अंतर्गत प्रवास वाढण्याची शक्यता आहे. परंतु करोनाचे संकट कायम असल्याने या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे.

सचिन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक

शहर तसेच जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाले असले तरी राज्य शासनाने घोषित केलेले निर्बंध 1 जूनपर्यंत कायम आहेत. तसेच करोनाचा धोका कायम आहे. यामुळे वैद्यकीय कारण, जीवनावश्यक सेवा, तसेच आवश्यक आस्थापना वगळता इतरांवर कारवाई होणार आहे. यामुळे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.

दीपक पांडे, पोलीस आयुक्त

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com