रुग्णभेटीवर ‘बिटको’त निर्बंध; नातलगांचा गोंधळ

रुग्णभेटीवर ‘बिटको’त निर्बंध; नातलगांचा गोंधळ

नाशिकरोड । प्रतिनिधी

मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी काल सकाळी बिटको हॉस्पिटलला अचानक भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी बिटको हॉस्पिटल प्रशासनाला सूचना दिल्या. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या गर्दीवर निर्बंध घाला. शक्यतो रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाने नियम लागू केले.

मात्र त्यानंतर काही वेळाने हॉस्पिटल प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातलगांची गर्दी झाली. आम्हाला आमच्या रुग्णांना भेटू द्या, अशी मागणी त्यांनी केली. वशिला असणार्‍या रुग्णांच्याच नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये सोडले जात आहे.

अनेक नगरसेवक आणि अधिकारी बिनधास्तपणे आता जातात. त्यांना कोणी अडवत नाही. मग आमच्यावरच निर्बंध का? असे म्हणून नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

हा प्रकार बराच वेळ सुरू होता. त्यानंतर प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी नातेवाईकांची समजूत काढून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com