
सप्तशृंगी गड | प्रतिनिधी
येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर श्री भगवती मंदिर सभामंडपाचा जिर्णोद्धार करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्थ संस्थेकडून देण्यात आली आहे...
सप्तशृंगी गड विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधाअंतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात निवास व्यवस्था तसेच ना नफा ना तोटा या तत्वावर अल्प दरात प्रसादालय भोजन व्यवस्था कार्यान्वित केली असून, विश्वस्त मंडळामार्फत श्री भगवती मंदिर जिर्णोद्धाराचे काम व श्री भगवती मंदिर गाभारा चांदीचे नक्षीकांत काम हाती घेण्यात आले आहे.
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने सन १९८१ मध्ये श्री भगवती मंदिर सभामंडपाचे बांधकाम केले होते. मात्र ४२ वर्षांनंतर बांधकामातील नवीन तंत्रज्ञान तसेच संगणक प्रणालीवर आधारित अद्ययावत सेवा सुविधा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने दर्शन नियोजन, अंतर्गत विद्युतीकरण, सीसीटीव्ही प्रणाली, दर्शनी भागाचे सुशोभीकरण करणे, मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे नियोजन विद्यमान अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने केले आहे.
हा सोहळा अक्षय्य तृतीयेला दि. २२ रोजी दुपारी १ वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे. बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वस्त संस्थेमार्फत देण्यात आली आहे.