बोलठाण । वार्ताहर Bolthan

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व शिक्षणाची गोडी कायमस्वरूपी टिकून राहावी या उद्देशाने गल्लीतील शाळा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. गल्लीतील शाळेस विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहत असल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

करोनामुळे लॉकडाऊनच्या धोरणामुळे सर्व काही बंद होते ठराविक काळानंतर हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत असतांना शिक्षण क्षेत्र मात्र अजूनही खुले झालेले नाही. ऑनलाईनव्दारे शिक्षण सुरू असले तरी ते घेणे ज्यांच्या मोबाईल नाही त्यांना शक्य नाही. ऑनलाईन क्लासेस झूम गुगल मीट या माध्यमातून अध्ययनाचे काम सुरू असले तरी तितके व्यापक व प्रभावी ठरलेले नाही.

मात्र ग्रामीण भागातील शिक्षकांकडून माझा मित्र माझा अभ्यास, गल्लीतील शाळा, समूह शिक्षण यासारखे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी टिकवून ठेवण्याचे काम तसेच शैक्षणिक वातावरण तयार करण्याचे काम केले जात आहे. व या उपक्रमास विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा ही सहयोग लाभत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मदत झाली आहे.

हे कार्य शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव एन.जी. ठोके यांच्या प्रेरणेतून व मुख्याध्यापक सुदाम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयूर कायस्थ, सर्व सदस्यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे राबविली जात आहे.