नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निकालातील त्रुटींमुळे आलेल्या सुमारे सहा हजार तक्रारींचे निवारण करून सुधारीत निकाल तयार केला आहे.

त्यातील दोन हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन जाहीर केल आहे. परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या तारखेपेक्षा दोन दिवस आधीच तयार केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडथळे आले. त्याचा परिणाम निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आले.

अनेक विद्यार्थ्यांना एकाच विषयात शून्य गुण मिळाले होते, तसेच परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवणे, चुकीचा विषय गुणपत्रिकेत दाखवणे अशा अनेक तक्रारी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने गडबड असताना चुकीच्या निकालामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने विद्यापीठाने त्यांचे विश्लेषण करून त्याची कारणे शोधण्यास सुरूवात केली. यात काही तक्रारी तांत्रिक चुका, विद्यार्थ्यांनी दोन ईमेल देणे, वारंवार पेपर सोडविणे या कारणामुळे निकाल बदलला असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते.

विद्यापीठाकडे आलेल्या सर्व तक्रारींचे ३ डिसेंबर पर्यंत निवारण केले जाईल असे परीक्षा विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले होते. परंतु दोन दिवस आधीच हे काम पूर्ण केले आहे. विद्यापीठाने दोन दिवस आधीच सुमारे सहा हजार जणांचा सुधारीत निकाल तयार केला.

हा निकाल अपलोड करण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत दोन हजार जणांचा निकाल जाहीर केला आहे. उर्वरीत निकाल ही लवकरच अपलोड केले जाणार आहेत