स्टाईसच्या सहा संचालकांचे राजीनामे

संस्था बरखास्त होणार की मुदतवाढ मिळणार?
स्टाईसच्या सहा संचालकांचे राजीनामे

सिन्नर । प्रतिनिधी

तालुक्यातील मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्येगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाईस) सहा संचालकांनी राजीनामे दिल्यामुळे विद्यमान चेअरमन पंडित लोंढे यांच्या गटतील केवळ सहा सदस्य शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता संस्था बरखास्त होणार की मुदतवाढ मिळणार याकडे उद्योग क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिन्नरचे माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी स्थापन केलेली ही संस्था आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत ठरली होती. कालांतराने या संस्थेत स्व. गडाख त्यांच्या विरोधकांची सत्ता आली. मात्र सत्ता आल्यानंतर त्यांच्यातही दोन गट पडल्यामुळे संस्था नेहमी चर्चेत राहिली.

दुष्काळी तालुक्यात आजही हजारो हातांना काम देणार्‍या या औद्योगिक वसाहतीत संचालकांच्या अंतर्गत वादामुळे उद्योजक आणि कामगारांच्या प्रश्नांसह वसाहतीतील विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या विद्यमान चेअरमन पंडित लोंढे आणि ज्येष्ठ संचालक तथा माजी व्यवस्थापक नामकर्ण आवारे यांचे समसमान बल आहे. त्यामुळे संस्था बरखास्त होते की तिला मुदतवाढ मिळते याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

राजीनामे दिलेल्या संचालकांत नामकर्ण आवारे, संदीप आवारे, अरुण चव्हाणके, प्रभाकर बडगुजर, पद्मा सारडा, चिंतामण पगारे यांचा समावेश आहे. सहा संचालकांनी राजीनामे दिले असले तरी विद्यमान चेअरमन पंडित लोंढे, अविनाश तांबे, मीनाक्षी दळवी, रामदास दराडे, सुनील कुंदे, किशोर देशमुख हे कार्यरत आहेत. तेरावे संचालक दिलीप शिंदे यांचे पद रद्द गेल्याचा दावा सध्या न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे आता संस्थेवर प्रशासक येणार की आणखी काही होणार याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

देश आणि राज्यावर जो करोनाचा प्रसंग ओढवला आहे त्याच्याशी उद्योजक झुंजत आहेत. अशा कठीण प्रसंगी सर्व संचालकांनी स्टाईस प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून उद्योजकांना मदत करायला हवी. मात्र अशा परिस्थितीत राजीनामे देऊन संस्थेच्या कामकाजात खीळ घालण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे.

अविनाश तांबे, माजी अध्यक्ष

करोनाकाळात उद्योजकांचे नुकसान होऊनही मदत मिळाली नाही. संस्थेचे कामकाज ठप्प असून सभासदांना कुठलीच सेवा मिळत नाही. माझ्याकडे सत्ता नसतानाही उद्योजकांच्या हितासाठी सतत प्रयत्न सुरू ठेवले. ते यापुढेही सुरूच राहतील. राजीनामा का दिला याचे उत्तर योग्य वेळी योग्य पद्धतीने देईल.

नामकर्ण आवारे, संचालक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com