
नाशिक । भारत पगारे
लॉकडाऊनमधील वीजबिलांवरून एकीकडे गोंधळ सुरू असताना दुसरीकडे मात्र गेल्या महिनाभरात नाशिक शहर मंडळात 2 लाख 80 हजार वीज ग्राहकांनी 66 कोटी 29 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. बिल भरण्यात नाशिक शहर विभाग एक आणि दोनमधील वीज ग्राहक आघाडीवर आहेत.
गेल्या महिनाभरात नाशिक शहर मंडळातील विभाग एकमध्ये 82 हजार 210 ग्राहकांनी 26 कोटी 47 लाख, शहर विभाग दोनमधील 1 लाख 41 हजार 804 ग्राहकांनी 26 कोटी 45 लाख रुपये वीजबिल भरले. तसेच शहर मंडळाच्या चांदवडमधील 16 हजार 473 ग्राहकांनी 4 कोटी 24 लाख व नाशिक ग्रामीणमधील 39 हजार 521 ग्राहकांनी 9 कोटी 13 लाख रुपयांचा वीज भरणा केला आहे. बिलांचा भरणा करणार्यांमध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व लघुदाब ग्राहकांचा समावेश आहे. घरगुती वीज ग्राहकांनी जूनमध्ये एकत्रित आलेल्या तीनते चार महिन्यांच्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये.
वीजबिलाच्या पडताळणीसाठी गेल्या तीन ते चार महिन्यांचा संपूर्ण हिशेब https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. एकाही पैशाचा अतिरिक्त भुर्दंड वीज ग्राहकांवर जूनच्या बिलामध्ये लावण्यात आलेला नाही. ग्राह कांकडे असलेल्या मीटरचे रीडिंग घेतल्यानंतर अचूक वीजवापराचे बिल तयार करण्यात आले आहे व बिलामध्येस्लॅब बेनिफीट व स्लॅबनुसार दर आकारणी करण्यात आली आहे, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क आधिकारी विकास आढे यांनी दिली आहे.
असा झाला वीज भरणा
मालेगाव मंडळात कळवण, मालेगाव, सटाणा व मनमाडचा समावेश आहे. येथे 37 हजार 224 ग्राहकांनी 7 कोटी 62 लाख रुपयांचे बिल भरले आहे. तसेच अहमदनगर मंडळात कर्जत, संगमनेर, श्रीरामपूरचा समावेश आहे. येथील 1 लाख 55 हजार ग्राहकांनी 34 कोटी 73 लाखांचा भरणा केला आहे.
वीज सेवकांचा समजूतदारपणा
लॉकडाऊनमुळे महावितरणकडून मीटर रडिंग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र जून महिन्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीच्या रीडिंगनुसार वीजबिल दिल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येककार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉटस्अॅप ग्रुप आदींद्वारे शंका निरसनाचे काम सुरू असून महावितरणचे वीज अधिकारी व सेवक आलेल्या वीज ग्राहकांच्या तक्रारी व विविध समस्यांचे निराकरण करताना दिसून येत आहेत.