करोना योद्ध्यांंसाठी बेड राखीव ठेवा

पोलीस आयुक्तांना आदेश काढण्याची वेळ
करोना योद्ध्यांंसाठी बेड राखीव ठेवा
करोना

नाशिक । प्रतिनिधी

करोना महामारीच्या संकाटात सर्वात आघाडीच्या फळीत कार्यरत असलेल्या पोलीस तसेच इतरही करोना योध्यांसाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये बेड्स राखीव ठेवावेत, असे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना काढण्याची वेळ आली आहे.

करोना योद्धे म्हणून काम करणार्‍या पोलिस, होमगार्डस, आणि महापालिका कर्मचार्‍यांना करोना बाधा होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांनाच आवश्यकता असतानाही बेड्स तसेच वेळीच उपचार मिळत नसल्याची स्थिती आहे. शहरासह जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू आहे. वाढणारे आकडे थोडे कमी झाले असले तरी फारसा काही दिलासा मिळालेला नाही.

समोर येणारे रुग्ण आणि हॉस्पिटलची संख्या यांचे प्रमाण फारच व्यस्त असल्याचा फटका रुग्णांना बसतो. यात पहिल्या फळीत कारोना योध्दा म्हणून काम करणारा पोलिस, होमगार्डस, महापालिका हे विभाग अपवाद नाहीत. मागील वर्षापासून आतापर्यंत शहर पोलिस दलातील 671 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत 160 पोलिस अधिकारी व कर्मचारी बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

यात 11 पोलिस कर्मचार्‍यांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झालेला आहे. त्यातच वाढत्या करोना रूग्णांमुळे फ्रंटलाईन वर्कसलाही बेड्स मिळत नाही. यामुळे संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांच्या मनोबलावर परिणाम होतो आहे.

आपल्यासह कुटुंबियाना बेड्स आणि उपचार मिळण्याची शाश्वती असल्यास फ्रंटलाईन वर्कर प्राधन्याने आपले कर्तव्य बजावतील. त्यामुळे हे आदेश काढण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. हा आदेश सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती शहरातील हॉस्पिटल्स प्रशासनाला लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी पोलिस ठाण्यांसह महापालिका प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com