गट, गणांसाठी उद्या आरक्षण सोडत

गट, गणांसाठी उद्या आरक्षण सोडत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य निवडणूक आयोगातर्फे ( State Election Commission )जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांसाठी गुरुवारी (दि. 28) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सोडतीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या गटांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे निघणार असून, गणांचे आरक्षण पंचायत समित्यांमध्ये निघणार आहे.

जिल्हा परिषद गट व पंचायत समितीतील गणातील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी ही सोडत काढली जाईल.गुरुवारी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन भवनात जिल्हा परिषदांच्या गटासाठी आरक्षण सोडत होईल.नाशिक तहसीलदार दालनात सकाळी 11 वाजता नाशिक पंचायत समितीच्या गणांसाठी सोडत काढली जाईल.

तसेच प्रत्येक तालुकास्तरावर त्या त्या पंचायत समितीच्या गणांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. शुक्रवारी (दि. 29) निवडणूक विभागाकडून आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान, गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे हरकती व सूचना सादर करण्यासाठी मुदत दिली असल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सकाळी 11 वाजता दिंडोरी पंचायत समिती सभागृहात दिंडोरी, इगतपुरी पंचायत समिती सभागृहात इगतपुरी, कळवण पंचायत समितीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहात कळवण, बागलाण पंचायत समितीच्या सभागृहात बागलाण, सुरगाणा पंचायत समिती सभागृहात सुरगाणा पंचायत समिती गणांसाठी आरक्षण काढले जाईल.

त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये त्र्यंबकेश्वर, चांदवड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत चांदवड, नांदगाव तहसीलदार दालनात नांदगाव, येवला तहसीलदार कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील बैठक सभागृहात येवला, देवळा तहसील कार्यालातील नवीन प्रशासकीय इमारतीत देवळा, पेठ तहसील कार्यालय नवीन इमारतीत पेठ, मालेगाव तहसील कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये मालेगाव, निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारातील हॉलमध्ये निफाड, तर सिन्नर तहसील कार्यालयात पंचायत समिती गणांसाठी आरक्षण निघणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com