रासाकाला जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती

आ. बनकरांकडून रासाका परिसरातील रस्त्यांची पाहणी
रासाकाला जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला रानवड सहकारी साखर कारखाना ( Ranwad Cooperative Sugar Factory ) स्व. अशोकराव बनकर नागरी पतसंस्थेच्या ( Late. Ashokrao Bankar Nagari Patsanstha ) माध्यमातून येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार असल्याने रानवड कारखाना कार्यस्थळावर निफाडचे आमदार दिलीप बनकर ( MLA Dilip Bankar ) यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या (Repair of roads ) कामांना वेग आला आहे.

रानवड सहकारी साखर कारखाना स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून 15 वर्षांकरता भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला असून सध्या या कारखान्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. सद्यस्थितीत साखर कारखाना कार्यस्थळाला जोडणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. कारखान्याकडे जाणार्‍या पालखेड-रानवड रस्ता तसेच रानवड-नांदुर्डी रस्ता कामाची आ. बनकर यांनी पाहणी करून या रस्त्याच्या बाबतीत आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

रानवड सहकारी कारखान्याचे काम प्रगतिपथावर असून येत्या तीन महिन्यांत कारखान्याचा बॉयलर पेटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना परिसर व वसाहतीत बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सुनसान झालेली कामगार वसाहत पुन्हा या कामगारांच्या कुटुंबियांनी गजबजणार असून कारखान्याच्या मशिनरी दुरुस्तीबरोबरच वीज, पाणी, रस्ते आदींची सुविधा करण्यात येत आहे.

रासाका लवकर चालू व्हावा यासाठी आ. बनकर यांच्यासह स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे आदींसह पतसंस्थेचे संचालक रासाका कार्यस्थळावर वेळोवेळी भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला रासाका येणार्‍या ऊस गाळप हंगामात पुन्हा सुरू होत असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह रासाका सभासद, कामगार, व्यावसायिक व परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com