मेनरोड महापालिका कार्यालयाची महिन्यात दुरुस्ती करा

महापौरांकडुन इमारतीची पाहणी; प्रशासनाला सुचना
मेनरोड महापालिका कार्यालयाची महिन्यात दुरुस्ती करा

नाशिक । Nashik

नाशिकनगरीच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या नाशिक महानगरपालिकेची मेनरोड भागातील जुनी इमारत ही पुरातन वास्तू असून त्याची दुरुस्ती एक महिन्याच्या आत करा, अशा सूचना महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी आज प्रशासनाला दिल्या.

नाशिक महानगरपालिकेची मेनरोड येथील जुनी इमारत पुरातन वास्तू असून तिथे देखभाल होत नसल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेचे स्वातंत्र्यपूर्व काळातील मेनरोड भागातील महानगरपालिका कार्यालय याची आज महापौरांनी पाहणी केली.

या पाहणी दौर्‍यात महापौरांनी इमारतीची व दुरुस्तीसंदर्भातील कामाची माहिती शहर अभियंता संजय घुगे, नगररचना कार्यकारी अभियंता राजेंद्र आहेर यांच्याकडुन घेतली.

यावेळी माजी नगरसेवक राजाभाऊ बागुल उपस्थित होते. ही ऐतिहासिक वास्तू असुन तिचें चांगल्या प्रकारे जतन व्हावे, तसेच ही इमारत नाशिक शहराची हेरीटेज म्हणून ओळखली जावी याकरिता स्वतंत्र निधी मंजूर करून इमारतीची डागडुजी व नूतनीकरण तसेच सुशोभीकरण व्हावे याबाबतच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र बागुल व परिसरातील रहिवाशांनी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.

मनपाच्या या जुन्या इमारती लगत सुरू असलेल्या बांधकामांमुळे या मनपाच्या जुन्या इमारती धोका होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांना महापौरांनी दिल्या. तसेच या इमारतीवर वड पिंपळाच्या फांद्या वाढल्या असून गवतही उगवलेले आहे ते त्वरित काढून स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच या इमारतीवर असणारे घड्याळ त्वरित दुरुस्त करावे या इमारतीच्या देखभालीसाठी कायम कायमस्वरूपी निधीची तरतूद करावी अश्या सूचना महापौरांनी केल्या. या इमारतीच्या मागील बाजूच्या भागाची दुरुस्तीचे काम गतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या कार्यालयाच्या परिसरात अनेक वस्तू पडून असून त्या त्वरित काढून घेण्याच्या सूचना दिल्या. ही सर्व कामांना प्राधान्य देऊन एक महिन्यात काम करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com