नांदूरशिंगोटे । Nandurshingote (वार्ताहर)

येथील श्री रेणुका माता यात्रोत्सव व आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाविकांसह व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पौष शुद्ध प्रतिपदेला सुरू होणारा तीन दिवसीय यात्रोत्सव यंदा प्रथमच करोना संकटामुळे रद्द करावा लागला आहे. जानेवारीपासून हा यात्रोत्सव सुरू होणार होता. परिसराचे श्रद्धास्थान व अनेकांचे कुलदैवत असल्याने पूजाअर्चा, नवसपूर्ती करण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. पूजा साहित्य विक्रेते, मिठाई दुकानदार, खेळणी विक्रेते, रहाट पाळणा व इतर व्यावसायिक, तमाशा कलाकार आदींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

तरीदेखील शासन निर्णयानुसार ग्रामस्थांनीही एकमुखी निर्णय घेऊन यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. यात्रोत्सवकाळात नोकरदारवर्ग, नातेवाईक आदींनी कोणीही यात्रोत्सवास येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, देवीचा पंचोपचार पूजाविधी, मंगलस्नान, अभिषेक व मानसन्मान, इतर धार्मिक विधी केले जाणार आहेत.

बैठकीसाठी विनायक शेळके, भाऊपाटील शेळके, आनंद शेळके, शंकरराव शेळके, सोपान मंडलिक, दीपक बर्के, सरपंच गोपाळ शेळके, संदीप भाबड, निवृत्ती शेळके, अनिल शेळके, नानासाहेब शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच मकरसंक्रांतीच्या पर्वकाळात रेणुका माता यात्रोत्सव सुरू होणार होता. अत्यंत पवित्र पर्वकाळ असूनही यात्रोत्सव रद्द करावा लागत आहे.
गोपाळ शेळके, सरपंच