बाराद्वारी दशक्रिया विधी परिसराचे नूतनीकरण

बाराद्वारी दशक्रिया विधी परिसराचे नूतनीकरण

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

शहरातील पुरातन बाराद्वारीतील दशक्रिया विधी शेडचे 15 लाख रुपये खर्च करून नुकतेच नूतनीकरण (Renovation) करण्यात आले असून माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने केलेल्या या कामामुळे दशक्रिया विधीसाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे...

शहरातील या पुरातन बाराद्वारीत वर्षानुवर्ष दशक्रिया विधी पार पडतात. मात्र, शहराबरोबरच वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत दशक्रिया विधीची जागा अपुरी पडू लागली होती. शहराजवळच्या माळेगाव, मापारवाडीत दशक्रिया विधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने तेथील लोकही आपल्या आप्तेष्टांच्या दशक्रिया विधीसाठी बाराद्वारीतच येत असत.

मात्र, दशक्रिया विधीसाठी एकमेव शेड असल्याने दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना, त्यांच्या नातेवाईकांना उघड्यावर बसून दशक्रिया विधी पार पाडावे लागायचे. एकापेक्षा जास्त दशक्रिया विधी राहिल्यास सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागायचा. पावसाळ्यात दशक्रिया विधीसाठी येणार्‍यांना पावसात भिजतच धार्मिक विधी पार पाडावे लागायचे.

या भागात आंघोळीसह इतर सुविधा नसल्याने मृताच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागायचा. या सर्व बाबी माजी आमदार वाजे यांच्या दृष्टीस पडल्यानंतर या दशक्रिया विधी शेडच्या नूतनीकरणासह वाढीव शेड बांधण्याची सूचना त्यांनी नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे यांना केली होती.

या प्रभागातील नगरसेवक प्रमोद चोथवे, सुजाता भगत यांनी यासाठी पाठपुरावा केला आणि नगर परिषदेने या कामासाठी 15 लाखांची तरतूद केली. नुकतेच हे काम पूर्ण झाले असून दशक्रिया विधीसाठी थेट तीन शेड उभारण्यात आल्या असून एकावेळी 5-6 दशक्रिया विधी पार पाडणे त्यामुळे शक्य होणार आहे.

दशक्रिया विधीसाठी येणार्‍या 500 नागरिकांना बसता येईल अशी प्रशस्त निवारा शेडही उभारण्यात आली आहे. दशक्रिया विधीसाठी येणार्‍या महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीसाठी दोन स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. केश कर्तनासाठी सरस्वती नदीच्या काठावर पायर्‍याही साकारण्यात आल्या असून परिसर स्वच्छता ठेवण्यास त्यामुळे हातभार लागणार आहे.

सिन्नर शहर (Sinnar City) आता वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत बाराद्वारी व नागेश्वरी येथेच दशक्रिया विधीची व्यवस्था आहे. मात्र, बाराद्वारीत शहरासह उपनगरे व माळेगाव-मापारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील लोकही दशक्रिया विधीसाठी येत असतात. दशक्रिया विधीसाठी एकच शेड असल्याने इतरांचे हाल व्हायचे. नवीन तीन शेडबरोबरच पाण्यासह स्वच्छतागृहाचीही व्यवस्था झाल्याने दशक्रिया विधीसाठी येणर्‍यांचे हाल बंद होतील.

- प्रमोद चोथवे, नगरसेवक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com