बिलासाठी मयताच्या अंगावरील दागिने काढून घेतले!

देवळालीतील रुग्णालयाचा निर्दयीपणा; अद्याप गुन्हा दाखल नाही
बिलासाठी मयताच्या अंगावरील दागिने काढून घेतले!

देवळाली कँम्प । Deolali Camp

करोनाच्या महामारीचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता हॉस्पिटलच्या निर्दयीपणाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर बिल वसुलीसाठी मयताच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यापर्यंत मजल गेल्याने, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. एवढे होऊन ही पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल न करता नेहमी प्रमाणे तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

सद्यपरिस्थितीत कोणत्याही प्रकारची अनामत करोना रुग्णांकडून घेऊ नये असे स्पष्ट आदेश राज्याचे आरोग्य मंत्री यांनी दिलेले असतांना देवळाली कँम्पला लँमरोडवरील हॉस्पिटलमध्ये १३ एप्रिलला शकुंतला गोडसे यांना उपचाराकरिता त्यांच्या कुटूबियांनी दाखल केले. त्याचवेळी दवाखान्याच्या व्यवस्थापनाकडून एक लाख रूपये अनामत भरण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान परिवाराने तातडीने पस्तीस हजार भरून उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिले. तेरा व चौदा एप्रिलला रुग्णांवर दवाखान्याकडून योग्य ते उपचार न केल्याने शकुंतला गोडसे यांचे निधन झाले, असा आरोप परिवाराकडून करण्यात आला आहे.

अंतिम संस्कारानंतर घरात कुंटूबियांत दोन तीन दिवसांनी चर्चा होऊन शकुंतला गोडसे यांच्या हातातील बांगड्या दवाखान्यात जाताना होत्या. मात्र दवाखान्यातून परत येतांना बांगड्या नसल्याने नातेवाईक यांनी दवाखान्यात जाऊन शनिवारी १७ एप्रिलला चौकशी केली असता तेथील स्टाफने बांगड्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केली असता बाचाबाची झाली. नंतर तुमचे बिलापोटी चाळीस हजार भराव्याचे बाकी असल्याने बांगड्या काढून ठेवल्याचे एक महिला कर्मचारी बोलून गेली. दरम्यान दवाखान्याच्या व्यवस्थापनाकडून सांयकाळी गोडसे परिवाराला बोलवून बांगड्या सुरक्षित असल्याचे सांगत उर्वरित बिल भरण्याचे सांगण्यात आले.

शनिवारी रात्री उशीरा विलास गोडसे यांनी दवाखाना व्यवस्थापनेच्या निष्काळजीपणा वेळकाढू धोरण यामुळे आपल्या आईचा प्राण गमवावा लागल्याची तक्रार देवळाली कॅम्प पोलिसांना दिली. पोलिसांनी गोडसे यांचा तक्रार अर्ज घेतला असून तपास करून गुन्हा दाखल करू असे सांगितले.

दवाखान्याबाबत तक्रारी

गेल्या वर्षभरात अनेकांना या दवाखान्याच्या व्यवस्थापनाबद्दल त्रास झाला असून पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार झाली आहे. येथील कोविड रुग्णांना आकारण्यात येणारे बिल अवास्तव आकारके जाते. सध्या रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे येथील हॉस्पिटलची मनमानी सहन करावी लागत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

बिलाची होणार चोकशी

गोडसे परिवाराचे रुग्णांचे बिलाबाबत कॅन्टोमेन्ट प्रशासन यांचे कडून पडताळणी करून, शासनाचे नियमाप्रमाणे चोकशी केली जाणार आहे.

-सुभाषचंद्र देशमुख, वपोनी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com