चिद्दरवार यांचा पदभार काढला

सीईओ बनसोड यांचा दणका
चिद्दरवार यांचा पदभार काढला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेतील ( Zilla Parishad Nashik ) बांधकाम विभागाबाबत तक्रारी येताच गायत्री पवार यांचे निलंबन केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ( ZP CEO- Leena Bansod ) यांनी आरोग्य विभागातील ( Department of Health ) वादग्रस्त व तक्रारी प्राप्त झालेल्या आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद चिद्दरवार यांचा पदभार काढून त्यांना दणका दिला आहे.

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी चिद्दरवार आर्थिक मागणी करतात अशा तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या. याबाबत प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीनंतर बनसोड यांनी तत्काळ चिद्दरवार यांचा पदभार काढला. हा पदभार डॉ. हर्षल नेहते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. चिद्दरवार यांचा पदभार काढून घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी त्यांच्याकडील सर्व फाईली व कागदपत्रे जमा करून घेतली आहेत.

जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील सेवक, अधिकारी यांचे वैद्यकीय देयके आरोग्य विभागास सादर केल्यानंतर त्यास तांत्रिक मान्यता दिली जाते. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांना तांत्रिक मान्यता देण्याचा टेबल आयुर्वेद विस्तार अधिकारी मिलिंद चिद्दरवार यांच्याकडे होता. चिद्दरवार यांना 2019 मध्ये ठाणे जिल्हा परिषदेत लाच घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नाशिक जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्यात आली होती.

निलंबन झालेले असताना त्यावेळी त्यांच्याकडे वैद्यकीय देयके तांत्रिक मान्यतेचा टेबल सोपवण्यात आला. देयके सादर केल्यानंतर बिलांच्या 20 टक्के रकमेची सर्रासपणे मागणी केली जात असल्याची ओरड होती. मात्र त्याबाबत अधिकृत तक्रारी प्राप्त झालेल्या नव्हत्या. गायत्री पवार यांच्यावर बनसोड यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर चिद्दरवार यांच्याविरोधात सेवकांनी लेखी तक्रारी बनसोड यांच्याकडे दाखल केल्या. त्या तक्रारींची दखल बनसोड यांनी घेतली. चिद्दरवार यांच्याकडचा वैद्यकीय बिले मंजूर करण्याचा पदभार काढून घेण्याचे आदेश काढले. या कारवाईचे जि. प. सेवकांनी स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com