दरपत्रक प्रदर्शनावरून खासगी रुग्णालयांना स्मरणपत्र

दरपत्रक प्रदर्शनावरून खासगी रुग्णालयांना स्मरणपत्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाकाळात वारेमाप दर आकारून रुग्णालयांकडून रुग्णांची लूट करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अनेक ठिकाणी रुग्णसेवेचे दरपत्रक दर्शनी भागामध्ये दरपत्रक लावण्याचा नियमही धुडकावला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटिसा बजावल्यानंतर स्मरणपत्र देवून देखील खासगी रुग्णालय त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासन यावर काय पावले उचलता याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक खासगी दवाखान्यात कोणते उपचार उपलब्ध आहेत, त्या सुविधा कोणत्या कालावधीत मिळतील, सुविधेकरीता किती दर आकारले जातील, या सर्व माहितीचे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनीभागात लावणे अपेक्षित आहे. त्याबाबत मनपाने आग्रही भूमिका घेतली आहे त्याचबरोबर टोल फ्री क्रमांक देखील ठळक दिसेल अशा ठिकाणी नमुद केला जात नाही. मात्र, बहुतांश रुग्णालयांकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असून, महापालिकेच्या नोटिसांना देखील जुमानले जात नसल्याची बाब समोर येत आहेत. आतापर्यंत महापालिकेकडून या रुग्णालयांना दोन नोटीसा बजावल्यानंतर स्मरणपत्र दिले आहे. परंतु त्याकडे रुग्णालयांकडून कानाडोळा केला जात असल्याने, एकप्रकारे रुग्णांची लूटच केली जात आहे.

नाशिक शहर परिसरात नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची संख्या 668 इतकी आहे. त्यातील 598 रुग्णालयांनी परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. तर उर्वरीत 70 रुग्णालयांच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यातील बोटावर मोजण्या इतक्याच रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात आले असून, उर्वरीत रुग्णालयांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करण्याचे काम होत आहे. अशात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जावी, अशी मागणी पीडित रुग्णांद्वारे केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com