रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा

कृषीमंत्री दादा भुसे : करोना आढावा बैठक
रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करा

नाशिक । Nashik

करोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मालेगावसह ग्रामीण भागामध्ये ऑक्सिजन रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहे.

त्याअनुषंगाने संबधित अधिकाऱ्यांनी नियोजन करुन करोनाबाधित रुग्णाला आवश्यकतेनुसार रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात करोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकीत ते बोलत होते.

भुसे म्हणाले, मालेगाव शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील करोनाबाधित रुग्ण मालेगांवमध्ये उपचारसाठी येतात. त्यामुळे मालेगाव येथील खाजगी व कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी तात्काळ ड्युरा सिलिंडर व जम्बो सिलिंडर उपलब्ध करुन देण्यात यावेत.

सामान्य रुग्णालय, मालेगांव व ग्रामीण रुग्णालयात मानधन तत्वावर तत्काळ कर्मचारी भरण्यात यावेत. ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगीत उपचार घेणे शक्य होणार नसल्याने डी.सी.एच.सी सक्षम करण्यात याव्यात.

देवळा, नांदगावं ,मनमाड आणि नामपूर येथे कोविड सेंटर सुरु करण्यात यावे. मनमाड येथील रुग्ण उपचारासाठी मालेगांव येथे जात असल्याने मनमाड येथील आरोग्य सुविधा वाढविण्यात याव्यात.

ग्रामीण भागात घरुन उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी गावपातळीवर शाळा, मंगल कार्यालय ताब्यात घेवून त्याठिकाणी रुग्णांवर उपचार देण्यात यावे, असे भुसे यांनी सांगितले. मालेगांवसाठी प्रस्तावित असलेल्या 20 केएल ऑक्सिजन टँकचे काम लवकरात लवकर सूरु करण्यात यावे.

रेमडेसिव्हिर पुरवठा थेट कोविड रुग्णालयांनाच करण्यात येणार असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच अखंडित ऑक्सिजन पुरवठ्यासाठी विविध कंपन्यांचे इंडस्ट्रियल ऑक्सिजन सिलिंडर हे मेडीकल सिलिंडर म्हणून वापरता येवू शकतील का, याबाबत तात्काळ तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून तशी माहिती सादर करण्याची सूचना भुसे यांनी केली.

नोडल आॅफिसरची नियुक्ति : मांढरे

रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी एक लिक्विड टँक शासनाकडून उपलब्ध करुन मिळण्याबाबतची मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकित केली. इंडस्ट्रियल ऑक्सिजन सिलिंडर हे मेडीकल सिलिंडर म्हणून वापरण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून तशी कार्यवाही करण्यात येईल.

तसेच रेमडेसिव्हिरचा पुरवठा प्राधिकृत वितरकाकडून केवळ कोविड रुग्णालयांनाच होणार असल्याने रेमडेसिव्हिरच्या अवाजवी वापराला आळा बसणार आहे.

जिल्ह्यातील कोविडचे उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा होणारा वापर लक्षात घेता, नोडल अधिकाऱ्यामार्फत खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा व ऑक्सिजनच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com