रेमडीसीवीर काळाबाजारचे मुंबई कनेक्शन; आणखी चौघे ताब्यात

रेमडीसीवीर काळाबाजारचे मुंबई कनेक्शन; आणखी चौघे ताब्यात

२० इंजेक्शन हस्तगत

पंचवटी | वार्ताहर

मुंबई आग्रा महामार्गावरील के के वाघ कॉलेज समोर दोन दिवसांपूर्वी रेमडीसीवीर इंजेक्शन चढ्या भावाने विक्रीसाठी आलेल्या संशयितांना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता...

दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरू असताना या प्रकरणात अजून ४ संशयितांचा सहभाग आढळला असून त्यांच्याकडून २० रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणात आतापर्यत ८ आरोपीचा सहभाग आढळून आला असून या सर्वांना बुधवार(दि.१९) पोलीस कोठडी मिळाली आहे.

गुरुवार (दि १३) अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांना केके वाघ कॉलेज समोर दोन महिला रेमडीसीवीर इंजेक्शन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

देशमुख यांनी आडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क करून पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेत केके वाघ कॉलेज समोर उभ्या असलेल्या संशयित श्रुती रत्नाकर उबाळे (वय २१), जागृती शरद शार्दुल (वय २१) दोन्ही रा.जत्रा हॉटेल चौक जवळ, नाशिक यांना रात्री पावणे अकरा वाजता ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील दोन रेमडीसीवीर इंजेक्शन, मोबाईल, स्कुटी ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.

त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी रेमडीसीवीर इंजेक्शन हे आम्ही स्नेहल अनिल पगारे (वय २२ वर्षे रा.शांती नगर, मनमाड नाशिक आणि कामेश रविंद्र बच्छाव वय २२ रा. उदय कॉलनी, नाशिक यांचे कडून घेतले असल्याचे सांगितले.

यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक तपास केला असता इंजेक्शनचा पुरवठा करणारे अजून चार संशयित विरार आणि वाडा जी.पालघर येथे असल्याची माहिती मिळाली.

त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६१ हजार रुपयांची २० रेमडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अद्याप पर्यत ८ आरोपींना जेरबंद करण्यात आले असल्याने रेमडीसीवीर इंजेक्शनच्या काळाबाजार करणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com