मार्गदर्शक तत्वानुसार रेमडेसिवीरचे वितरण व्हावे : कृषी मंत्री भुसे

मार्गदर्शक तत्वानुसार रेमडेसिवीरचे वितरण व्हावे : कृषी मंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी

जिल्ह्यासह तालुक्यात रेमडिसीव्हरचा तुटवडा भासत असून औषधांच्या दुकानांसमोर मोठ्या रांगा दिसत आहेत. या अनुषंगाने रेमडिसीव्हरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याचा काळाबाजार होणार नाही, यासाठी औषध दुकानांची पथकांमार्फत तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेमडेसिवीरचे वितरण व्हावे, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात सर्व विभाग प्रमुखांची करोनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, या प्रसंगी भुसे बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, पोलीस उपअधिक्षक प्रदीप जाधव, मनपा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृउबा उपसभापती सुनील देवरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, डॉ. शुभांगी अहिरे, डॉ. योगेश पाटील, डॉ. लोथे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, मनोहर बच्छाव, प्रमोद पाटील आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

रेमडेसिवीरचा पुरवठा कमी होत असल्यास तातडीने मागणी नोंदविण्याचे सांगताना भुसे म्हणाले, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय रेमडिसीव्हरचा पुरवठा करण्यात येवू नये. रुग्णांना गरज नसतांनाही काही नागरिक रेमडिसीव्हरचा साठा करत असून रेमडिसीव्हरबाबत नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, जेणेकरून ज्या रुग्णास रेमडिसीव्हरची गरज आहे तो यापासून वंचित राहता कामा नये. रेमडेसिवीर बरोबरच ऑक्सिजन, व्हेटींलेटर, मनुष्यबळाचा तुटवडा भासणार नाही यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही भुसे यांनी यावेळी केल्या.

लसीकरणाच्या बाबतीत शहरातील मुस्लीमबहुल भागात उदासीनता दिसून येत आहे. यासाठी या भागातील लोकप्रतिनीधी, मौलाना, धर्मगुरूंच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे. तर पश्चिम भागातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे. सर्व शासकीय व खाजगी कोवीड रुग्णालयातील उपलब्ध खाटा, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन आदि माहिती दर्शनी भागावर फलकाव्दारे प्रकाशित करून ती दररोज अद्यावत करण्यात यावी. सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात आली असली तरी त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. मागील बैठकीत सुचना करूनही एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी भरती न केल्यामुळे व शहरातील स्वच्छतेबरोबर फवारणीच्या कामकाजात उदासीनता दिसून येत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रुग्णवाढ दिसत असली तरी एकूण चाचण्यांच्या टक्केवारीनुसार रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील गृहविलगीकरणातील रुग्णांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केली असल्यास अशा रुग्णांना तत्काळ मालेगाव येथील करोना केअर सेंटरमध्ये दाखल करावे. डीसीएचसी सेंटर वाढविण्यात येवून भायगाव येथील करोना केअर सेंटरचा पूर्णक्षमतेने वापर करावा. मनमाड, चांदवड, देवळा, सटाणा येथील बहुतांशी रुग्ण मालेगाव येथे उपचार घेत आहेत. यावाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनावरील ताण वाढला आहे तरी जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करून स्थानिक पातळीवर तत्काळ निर्णय घेवून जलद कारवाई करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com