विभाजनाच्या अटी शिथिल करा
नाशिक

विभाजनाच्या अटी शिथिल करा

आ. कोकाटे यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी

Abhay Puntambekar

पंचाळे । वार्ताहर Sinnar / Panchale

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या विभाजनाचे प्रस्ताव त्यासंदर्भातील अटी व शर्तीमुळे धूळखात पडून आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये समावेश असलेल्या वाड्या-वस्त्या विकासापासून वंचित राहिल्या आहे.

या वाड्या-वस्त्यांचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतींच्या विभाजनासंदर्भातील अटी व शर्ती शिथिल करून त्यांचा विभाजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र देऊन केली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांना जोडलेल्या वाड्या वस्त्यांचा समावेश हा त्या गावाच्या ग्रामपंचायतींमध्येच करण्यात आला.

मात्र, ह्या वाड्या-वस्त्यांचा अद्याप विकास झालेला नाही व तेथील सदस्यांना राजकीय संधीदेखील मिळत नाही. 16 वर्षांपूर्वी ग्रामपंचायती स्वतंत्र करण्याबाबत घेतलेल्या आदेशातील निकष तत्कालीन परिस्थितीनुरूप घालण्यात आले होते. मात्र, आजची परिस्थिती बघता यात बदल होणे आवश्यक आहे.

आजही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक नाही. एका ग्रामसेवकाकडे साधारण 3 ते 4 ग्रामपंचायत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाकडे अजून एखादी ग्रामपंचायत वाढल्याने विशेष फरक पडणार नाही. ग्रामपंचायत विभाजनामुळे छोट्या गावांची, वाड्या वस्त्यांची स्वायत्तता अबाधित राहील.

सामान्य जनतेला केवळ एखाद्या दाखल्यासाठी अथवा कामासाठी करावी लागणारी पायपीट यामुळे बंद होईल. नव्याने निर्माण होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींना राजकीय संधीपासून दूर राहिलेल्याना सरपंच पदाची संधी मिळून विकासाचा अनुशेष भरून काढता येईल.

ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकीनंतर 2 वर्षांनी ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव सादर करावा लागत होता. याऐवजी कोणत्याही ग्रामपंचायतीला, केव्हाही विभाजनाचा प्रस्ताव सादर करता यावा, नव्याने स्थापन करावयाच्या ग्रामपंचायतीमध्ये वस्तीची लोकसंख्या सर्वसाधारण भागासाठी 2 हजारांऐवजी 1 हजार करावी, आदिवासी डोंगराळ भागासाठी 1 हजार लोकसंख्येऐवजी 500 करावी, दोन गावांतील अंतर 3 ऐवजी 2 किमी करण्यात यावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com