रेमडिसिव्हरसाठी नातेवाईक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

रेमडिसिव्हरसाठी  नातेवाईक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

नाशिक । Nashik

आॅक्सिजनसोबत जिल्ह्यात रेमडीसिव्हरचाही मोठा तुटवडा जाणवत असून कोटा पध्दतीने देखिल रुग्णालयात इंजेक्शन मिळेनासे झाले आहे.

रेमडिसिव्हर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त होत असल्याचे रुग्णालयांकडून सांगण्यात येत अाहे. त्यामुळे रेमडिसिव्हर मिळविण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत असून ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे.

करोना उपचारात प्रत्येक रुग्णासाठी रेमडिसिव्हर महत्वाचे नाही हे सांगून देखील इंजेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याला दहा हजार रेमडिसिव्हरचा कोटा मंजूर करण्यात आला असून दिवसाला एक ते दीड हजार इंजेक्शन प्राप्त होणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीत सात हजार रुग्ण आॅक्सिजन बेडवर असून रेमडीसिव्हर इंजेक्शनची मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. रेमडिसिव्हरचा काळा बाजार रोखण्यासाठी वितरकांऐवजी जिल्हा प्रशासनाकडून केंद्रिय वाटप पध्दतिने हे इंजेक्शन देण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला. रुग्णालयांनी त्यांची रेमडिसिव्हरची मागणी आॅनलाईन पध्दतिने जिल्हाप्रशासनाकडे नोंदववायची.

जिल्हाप्रशासन त्यांच्याकडे उपलब्ध कोट्यानूसार त्याचे वाटप करते. तसेच रेमडिसिव्हरचा काळा बाजार टाळण्यासाठी २४ भरारी पथके नेमण्यात आली. पण प्रचंड तुटवड्यामुळे जिल्ह्याला आवश्यकतेपेक्षा कमी रेमडिसिव्हर मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयांना त्यांच्या गरजेनूसार रेमडिसिव्हर उपलब्ध होत नाही.

रुग्णालयांकडून रुग्णांचा नातेवाईकांना इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयातुन वाटप होत असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्ण वाचविण्यासाठी हतबल रुग्णांचे नातेवाईक रेमडिसिव्हर मिळेल या आशेने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करत आहे. ही गर्दी हटविणे पोलिस प्रशासनासाठी तारेवरची कसरत ठरत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com