सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

नगपरिषदेच्या वतीने नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणार्या व्यक्तींची नोंदणी सुरू करण्यात आली असून वरील क्षेत्रात काम करणार्या नगरपरिषद क्षेत्रातील व्यक्तींनी पुराव्यासह नगरपरिषदेत संपर्क साधावा व दीनदयाळ अंत्यादेय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे.

केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची सध्या नगरपरिषदेच्यावतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरी भागातील दारिद्य्र निर्मूलन करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अभियानाच्या माध्यमातून शहरी गरीब व्यक्तींना उदरनिर्वाहाकरिता विविध घटकांच्याद्वारे सहाय्य करण्यात येत आहे. नागरी भागातील जोखीमेचे किंवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणार्या व्यक्तींचे बचत गट तयार केले जात आहेत.

नगरपरिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणार्या व वरील क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींनी संबंधित व्यवसाय करत असल्याच्या पुराव्यासह, ज्या बांधकाम व्यावसायिक, ठेकेदाराकडे काम करत आहेत त्यांचे शिफारस पत्रासह आपले नाव सिन्नर नगरपरिषद कार्यालयात सादर करावे व नागरी उपजीविका अभियानाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन केदार यांनी केले आहे.

जोखीमेचे किंवा धोकादायक क्षेत्रामध्ये काम करणार्या कुटुंबाची, व्यक्तींची यादी कामगार आयुक्त कार्यालय, हमाल पंचायत, स्वच्छता कामगार संघटना, सामाजिक संघटना, कचरा वेचक कामगार संघटना किंवा संस्था यांचेकडून उपलब्ध करून घेण्याचे कामही नगरपरिषद स्तरावर सुरू आहे.

सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या घटकाच्या माध्यमातून शहरी गरीब महिलांचे बचत गट तयार करून सदर बचत गट वस्तीस्तरीय संघास जोडणे व सर्व वस्तीस्तरीय संघ हे शहरस्तरीय संघास एकत्र जोडले जात आहेत.

अभियान अंतर्गत डिसेंबर 20 अखेर एकूण 228 बचत गट स्थापन करण्यात आले असून 11 वस्तीस्तरीय संघ व 1 शहरस्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 2518 महिलांचे संघटन झाले आहे.

त्यापैकी 219 प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे 21 लक्ष 90 हजार रुपयांचा फिरता निधी अभियानांतर्गत वितरित करण्यात आला आहे. यापैकी 50 बचत गटांना बँकेच्या माध्यमातून वार्षिक 4% व्याज दराने जवळपास 46 लक्ष रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अभियानांतर्गत महिलांना गट संकल्पना, नेतृत्व विकास व बदल तसेच आर्थिक साक्षरताबाबत प्रशिक्षण देणे, बँकेचे व्यवहार, विमाबाबत माहिती, शासनाच्या विविध योजनांची माहिती करून दिली जात आहे.

अभियान कार्यामुळे महिलांमध्ये नेतृत्व विकसित होत होऊन विविध विषयांवर महिला निर्भीडपणे आपले मत मांडत आहेत. अभियानाचे कार्य असेच यापुढे देखील चालू राहणार आहे.

याप्रमाणेच शहरी भागातील जोखीमेचे किंवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणार्या महिलांचे बचत गट तयार करून त्यांनादेखील वरीलप्रमाणे लाभ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी दिली.