असंघटित कामगारांची नोंदणी करा : जिल्हाधिकारी

असंघटित कामगारांची नोंदणी करा : जिल्हाधिकारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची (Unorganized sector workers) नोंदणी मोहीम स्तरावर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. ( Collector Gangadharan D )यांनी दिल्या.

असंघटित कामगार जिल्हास्तरीय अमंलबजावणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कामगार उपायुक्त विकास माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. एम. महाजन, सहायक कामगार आयुक्त सुजित शिर्के, सरकारी कामगार अधिकारी नवनीत वझरे, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा परिवेक्षक अधिकारी आर. एल. चौधरी, सहायक निबंधक मनीषा खैरनार, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी एन. ए. पाटोळे, भविष्य निर्वाह निधीचे प्रवर्तन अधिकारी सुरज प्रजापती यावेळी उपस्थित होते.

यावेळी गंगाथरन डी. म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगार, मनरेगा मजूर, शेतमजूर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, रिक्षा चालक, वीटभट्टी कामगार, फेरीवाले यांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांची प्राथमिक स्तरावर नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी व नागरी सुविधा केंद्र यांच्या समन्वयातून नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. यासाठी मोहीम स्तरावर जनजागृती करण्यात यावी.

इ-श्रम कार्डचे लवकरच वितरण

जिल्ह्यात एकूण 4 लाख 66 हजार 319 इतके ई- श्रम कार्डचे वितरण झाले असून येणार्‍या काळात 14 लाख 82 हजार 330 ई- श्रम कार्डचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त सुजित शिर्के यांनी यावेळी दिली. ई-श्रमद्वारे प्राप्त माहितीचा वापर असंघटित कामगारांच्या हितासाठी योजना बनविण्यासाठी होणार असून त्यामुळे स्थलांतरीत कामगारांची माहिती ठेवणे शासनास सुकर होणार असल्याचेही शिर्के यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com