जिल्ह्यातील विविध एमआयडीसीतील प्रश्न लवकरच मार्गी लावणार

जिल्ह्यातील विविध एमआयडीसीतील प्रश्न लवकरच मार्गी लावणार

नाशिक | प्रतिनिधी

माळेगाव(सिन्नर) येथील औद्योगिक वसाहतीतील पाणीप्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, घंटागाड्या, कचऱ्याची विल्हेवाट, पथदीपसह तेथील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून निमाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बैठक होऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील,असे आश्वासन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आणि अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांज्जे यांनी दिले.

सिन्नर-माळेगाव तसेच तळेगाव- अक्राळे या दिंडोरी तालुक्यातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली निमाच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवावी हा मुद्दा चर्चेला आला. १४ एमएलडी वरून ही मर्यादा २० एमएलडी करावी, पाण्याचा दर्जा सुधारावा असा आग्रह उद्योजकांनी धरला असता सध्याचे जे आरक्षण आहे ते पुरेसे आहे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले.परंतु भविष्यातील उपलब्ध लक्षात घेऊन ही मर्यादा वाढविणे गरजेचे आहे असे निमा पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले असता त्यात काही अडचण नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच ब्रेकडाऊन आणि मेन्टेनन्सच्या बाबतीतही यावेळी चर्चा झाली मेंटेनन्सच्या नावाखाली दोन दोन दिवस पाणी बंद राहते असे निमा पदाधिकाऱ्यांनी सांगितले असता भविष्यात असा प्रकार होणार नाही याची हमी अधिकाऱ्यांनी दिली.

नुकतेच निमाच्या पाठपुराव्यानंतर ९ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले माळेगाव औद्योगिक वसाहतीतील रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे लक्षात आणून दिले असता हा प्रश्न लवकर मार्गी लावू असे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले असता सदरील कॉन्ट्रॅक्टरला नोटीस बजावी व वेळप्रसंगी त्याला काळ्या यादी टाकावी अशी मागणी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

माळेगाव औद्योगिक वसाहतीत 'जे' ब्लॉक विकसित करताना उद्योजकांना त्यांच्या कंपनीत जाण्यासाठी एमआयडीसीने त्यांना रोड उपलब्ध करून देणे गरजेचे होते. उद्योजकांना भूखंडाचे वाटप झाले मात्र सर्व्हिसरोडची मागणी अजूनही प्रलंबित आहे. याकडे लक्ष वेधले असता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच या वसाहतीतील काही रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरून निमाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. ठेकेदारांना नोटीसा द्या,त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी आली असता त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नक्कीच याबाबत कार्यवाही करू असे सकारात्मक उत्तर दिले.

यावेळी दिंडोरी तालुक्यातील आक्रळे -तळेगाव औद्योगिक वसाहतीत भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतही साधक बाधक चर्चा झाली. विद्युत सबस्टेशन,फायर स्टेशन,ट्रक टर्मिनस,सीईटीपी प्रकल्प आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अंबड सातपूर व सिन्नर येथे येत असलेल्या अडीअडचणी या नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये होऊ नये तसेच माळेगावला लागून होत असलेल्या अतिरिक्त माळेगाव एमआयडीसीच्या जागेमध्ये सुद्धा या अडचणी येऊ नये यासाठी आधीच तरतूद करून ठेवण्याची चर्चा व निर्णय या बैठकीत झाला.

या चर्चेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव राजेंद्र अहिरे,उपाध्यक्ष आशिष नहार,किशोर राठी,कोषाध्यक्ष विरल ठक्कर,किरण वाजे,सुधीर बडगुजर,प्रवीण वाबळे,नितीन वागस्कर, मनीष रावल,सचिन कंकरेज,कैलास पाटील,गोविंद झा, सतीश कोठारी,समीर देशमुख,एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे,सिन्नरचे उपअभियंता मनोज पाटील व शशिकांत पाटील,अंबडचे उपअभियंता जयवंत पवार तसेच अन्य अधिकारी यांनी सहभाग घेतला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com