ट्रान्सपोर्ट क्षेत्रात वाहन चालकांच्या संख्येत घट; धोक्याची घंटा

ट्रान्सपोर्ट क्षेत्रात वाहन चालकांच्या संख्येत घट; धोक्याची घंटा

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

ट्रान्सपोर्ट क्षेत्रात वाहन चालकांना मिळणार्‍या सुविधांचा अभाव असल्याने सद्यस्थितीत या क्षेत्राकडे तरुणांचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. यामुळे भविष्यात दळणवळणाच्या या क्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे.

देशाच्या दळणवळणात अतिशय महत्वाचा घटक असलेल्या आणि अर्थव्यवस्थेच्या चक्रात महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या चालकांच्या पाठीशी सर्वांनीच खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. मात्र देशभरातील तुरळक ठिकाणे सोडली तर चालकांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वाहनचालकांना सुविधा मिळण्यासाठी व त्यांना आराम करण्यासाठी सर्वत्र निवारा घराची व्यवस्था करण्यात यावी या मागणीकरिता गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत.

मात्र त्या प्रयत्नांना अद्यापपर्यंत यश मिळाले नाही. ट्रक किंवा सर्वच अवजड वाहन चालकांना उद्योग क्षेत्रापासून ते सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंची ने-आण करण्याचे काम करावे लागते. याकरिता त्यांना कित्येक महिने आपल्या कुटुंबियांपासून दूर राहावे लागते. परिणामी त्यांच्यात व्यसनाचे प्रमाणही जडत असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. असे असताना वाहतूक करतेवेळी त्यांच्या वाहनामध्ये असलेल्या सर्व मालाची महत्वपूर्ण जबाबदारी ही चालकावर असल्याने कितीही थकले असतांना त्यांना गाडीपासून दूर जाणे शक्य होत नाही अथवा आराम करणे देखील शक्य होत नाही.

अशातच त्यांचा अपघात घडल्याची आत्तापर्यंत बरीच उदाहरणे बघायला मिळाली आहेत. यासोबतच वाहन चालकांनी त्यांचे वाहन थोड्या वेळाकरिता महामार्गाच्या आजूबाजूला लावून थोडा आराम करत असतांना स्थानिक काही भुरट्या चोरट्यांनी त्यांची लूटमार केल्याच्या घटना देखील बर्‍याचदा घडल्या आहेत. नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांची हेळसांड थांबावी व त्यांना आराम करण्यासाठी, आंघोळीसाठी सर्व सोयीयुक्त असे निवारा केंद्र प्रत्येक 150 ते 200 किलोमीटरवर उभारण्यात यावे अशी मागणी सतत करण्यात येत आहे. मात्र त्याकरिता शासन स्तरावरून सकारात्मक काही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. भविष्यात या व्यवसायाकडे तरुण पिढीने रोजगाराची संधी म्हणून बघितले पाहिजे याकरिता चालकांना सन्मान मिळण्याची गरज आहे. अन्यथा चालकांअभावी देशाची दळणवळण व्यवस्था ठप्प व्हायला वेळ लागणार नाही. ही देशासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आम्हाला मुंबई- पुणा एक्स्प्रेस रोडवरील खालापूर येथील निवारा केंद्राची पाहणी करण्यास सांगून त्याच धर्तीवर नाशकात मनपा हद्दीत सारथी निवारा केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर सदरहू प्रस्ताव लांबणीवर गेला. महापालिकेत नवीन आयुक्तांनी पदभार घेताच सदर प्रश्नाचा पाठपुरावा सुरु केला जाईल.

-राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com