महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडीसाठी भरती प्रक्रिया

महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडीसाठी भरती प्रक्रिया
USER

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील 23 एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पां ( Integrated Child Development Services Projects )मधील रिक्त 397 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात अंगणवाडी सेविका 131, मदतनिस 217 व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या रिक्त 49 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यंदा प्रथमच उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून अंगणवाडीतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ( State Minister for Women and Child Development Yashomati Thakur ) यांनी पद भरतीला हिरावा झेंडा दाखविला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी उमेदवारांच्या वयोमर्यादा 30 वरुन 40 करण्याची मागणी केली होती. परंतु, राज्य सरकारने ही वयोमर्यादा 32 पर्यंत वाढवली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 23 प्रकल्पांमधील रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

सुरगाणा-1, रावळगाव आणि मालेगाव या प्रकल्पांमध्ये एकही जागा रिक्त नसल्याने येथे ही प्रक्रिया राबवण्यात येत नाही. कोणत्याही पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही 21 ते 32 या वयोगटातील असावी. तसेच स्थानिक रहिवाशी असल्याचा गाव नमुना नं.8 चा उतारा जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. अंगवाडी सेविका व मिनी सेविका होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, मदतनीस या पदासाठी इ.सातवी उत्तीर्णतेची अट आहे.

मागास प्रवर्गातील उमेदवारांना मागास असल्याचा दाखला जोडणे अनिवार्य असेल. लहान कुटुंबातील असल्याचा दाखला जोडावा लागेल. तसेच जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्तींची पूर्तता करुन उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे अंगणवाडीतर्फे राबवण्यात येणारे उपक्रम यशस्वी करण्यास तसेच गरोदर माता व बालकांना योग्य आहार पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com