नाशिकरोड |प्रतिनिधी

चालू आर्थिक वर्षात ऑटोमोबाईलची मध्य रेल्वेने विक्रमी व लक्षणीय वाहतूक केली आहे. या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेतर्फे ऑटोमोबाईलच्या २४६ रेकची लोडिंग झाली आहे तर गतवर्षीच्या याच कालावधीत म्हणजे एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत ११८ रेक लोड झाले होते. रेल्वे वाहतुकीमुळे रस्ता वाहतूकीत खर्च होणारा वेळ, इंधन वाचत आहेच परंतु, कार्बन फूटप्रिंटची बचत होत आहे.

मध्य रेल्वेने क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) स्थापित केले आहेत. हे व्यवसाय विकास युनिट स्थानिक उद्योगांसह नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांचे मार्केटिंग करतात आणि त्यांच्या मागण्याचा विश्लेषण करतात. अशा उपक्रमांत महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि मारुती उद्योग आदी प्रमुख मोटार वाहन उद्योगांशी कार, पिक-अप व्हॅन, ट्रॅक्टर, जीपच्या वाहतुकी संदर्भात बैठका घेऊन नियोजन केले. त्यामुळे वाहन उद्योग हे रेल्वेने वाहतुकीसाठी अधिक रुची दाखवीत आहेत. चालू आर्थिक वर्षात मोटारींच्या वाहतुकीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते.

मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, पुणे विभागातील चिंचवड, सोलापूर विभागातील बाळे व नागपूर विभागातील अजनी स्थानकातून या वाहनांच्या वाहतुकीसाठी लोडिंग सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

विक्रमी वाढ

फेब्रुवारी २०२१ मध्ये रेल्वेने ३२ रेक (मालगाड्या) लोड केले. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत १२ रेक लोड केले होते. म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये १६६ टक्क्यांनी वाढ झाली. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २१) या कालावधीत ऑटोमोबाईलच्या २४६ रेकची लोडिंग झाली. गतवर्षी याच काळात (एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२०) ११८ रेक लोड झाले. चालू वर्षाच्या लोडिंगमध्ये १४६ टक्क्यांनी वाढ दिसून आली. गेल्या वर्षभरात ऑटोमोबाईलची वाहतूक देशाच्या विविध भागात केली गेली आणि बांगलादेशात निर्यातही झाली.

मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने ऑटोमोबाईल वाहनांना सहजपणे लोड करण्यासाठी व वाहून नेण्यासाठी प्रोटोटाइप कोच विकसित केला आहे आणि उत्पादकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून वाहतुकीची गती वाढविली आहे.