नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात 4659 पक्ष्यांची नोंद

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात 4659 पक्ष्यांची नोंद

निफाड। Niphad (प्रतिनिधी)

महाराष्ट्राच भरतपूर म्हणून संबोधल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात सप्टेंबर 2020 या महिन्याच्या अखेरची व पहिली पक्षी प्रगणना नुकतीच करण्यात आली असून यात 4659 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते 10 या वेळात वन अधिकारी, सेवक, स्थानिक गाईड, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्या मदतीने पक्षी प्रगणना पूर्ण करण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळून ही प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठूरे, कुरुडगाव, काथरगाव अशा एकूण 7 ठिकाणी केलेल्या पक्षी निरीक्षणात विविध पाणपक्षी व झाडावरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

यात एकूण 30 प्रजातीचे 3363 पाणपक्षी व 1296 झाडावरील, गवताळ भागातील पक्षी असे एकूण 4659 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रगणनेत उघड्या चोचीचा बगळा, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिलडक, गढवाल, स्पूनाबिल, रिव्हर टर्न, प्रॅटिन्कोल, कमळपक्षी, शेकाट्या, नदी सुरय आदी पक्षी आढळून आले.

नुकतीच पावसाने उघडीप दिली असून थंडीच्या आगमनाबरोबरच अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन पुढील काही दिवसात दिसण्याची शक्यता आहे. सध्या कोविड 19 मुळे पर्यटकांसाठी अभयारण्य बंद असल्याने शासनाने पर्यटनबंदी आदेश उठविल्यानंतर पर्यटकांना पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेता येईल.

पक्षी अभयारण्यातील या हंगामातील पहिल्या पक्षी प्रगणनेत सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचे भरत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, पक्षीमित्र दत्ता उगावकर, प्रा. आनंद बोरा, अनिल माळी, गिरीष कांगणे, बाळा सरोदे, किशोर वडनेरे, मेहूल थोरात, डॉ.उत्तम डेर्ले, किरण बेलेकर, राहूल वडघुले, नुरी मर्चट, डॉ. जयंत फुलकर, सुशांत रणशूर, प्रमोद महानुभाव, हर्ष बिरार तसेच अभयारण्यातील गाईड अमोल दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे, प्रमोद दराडे, रोशन पोटे, पंकज चव्हाण, ओंकार चव्हाण, सेवक डी.डी. फापाळे, गंगाधर आघाव, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, प्रकाश गांगुर्डे यांनी सहभाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com