
सटाणा | Satana
सटाणा मर्चंट को. ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Satana Merchant Co. Op. Bank election) ७४.७२ टक्के मतदान (Voting) झाले आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच तब्बल ६२३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे...
सोमवारी भाक्षी रोड येथील गुरुप्रसाद मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आदर्श पॅनल (Ideal panel) आणि सिद्धिविनायक पॅनलपैकी (Siddhivinayak Panel) सर्वाधिक जागा मिळवून समको बँकेवर कोणाची सत्ता येते? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला फलदायी ठरतो? यावरच जय पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
गत दोन वर्षांपासून लांबलेली सटाणा मर्चंट बँकेची निवडणूक आज सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडली. ८३४५ सभासद संख्या असलेल्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ६२३६ मतदारांनी हक्क बजावला. सकाळी ८ ते १२ या वेळेत २८ टक्के मतदान झालेले असताना दुपारी दोनपर्यंत ५८ टक्के मतदान झाले होते.
अखेरच्या सत्रात मतदारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत मतदानाच्या टक्केवारीने पंच्यातरी गाठत बँकेच्या इतिहासातील नवा विक्रम केला आहे. शहरातील मविप्रच्या मराठा हायस्कूल येथे २२ केंद्रांवर प्रत्येकी ४०० मतदारांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सहकार प्रशासनाच्या वतीने १७६ कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली होती.
किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली असून जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे, सहायक निवडणूक अधिकारी शरद दराडे, सहायक निबंधक तथा समकोचे प्रशासक जितेंद्र शेळके, सहकार अधिकारी अनिल पाटील, समकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली.