नासाकासाठी फेरनिविदा

20 ऑक्टोबरला अंतिम निर्णय; कारखाना सुरू होण्याचा मार्ग सुकर
नासाकासाठी फेरनिविदा

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नाशिक सहकारी साखर कारखाना Nashik Cooperative Sugar Factory भाडेतत्त्वावर देण्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने NDCC Bank फेरनिविदा जाहीर केली असून येत्या 20 ऑक्टोबर रोजी या निविदेचा अंतिम निर्णय होणार असल्याने कारखाना सुरु होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

आठ वर्षापासून बंद असलेला नासाका सुरू करणेबाबत लोकप्रतिनिधी व शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना जिल्हा बँकेने प्रसिद्ध केलेल्या निविदामध्ये असलेल्या त्रुटीमुळे मागील महिन्यातील सहकार मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत फेरनिविदा काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा बँकेने काल दिनांक 7 रोजी मराठी व इंग्रजी दैनिकात कारखान्याची चल व अचल मालमत्ता भाडेतत्त्वावर देणेबाबतची निविदा सूचना जाहीर केली आहे.

त्यानुसार निविदा फॉर्म विक्री दि. 7 ते 16 ऑक्टोबर या दरम्यान होणार असून मालमत्ता पाहणी कार्यक्रम दि. 11 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान असेल. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असून निविदा उघडण्याची तारीख 20 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता जिल्हा बँक येथे असणार आहे. मागील महिन्यातील निविदेबाबत जे आक्षेप घेण्यात आले होते ते दुरूस्त करून शिवाय जाचक ठरणार्‍या अटी-शर्ती बँकेने शिथिल करून सुटसुटीत निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बँकेने सरफेसी कायद्याअंतर्गत कारखान्याचा ताबा घेतलेला असल्याने त्यांना कर्जवसुलीसाठी करखाण्याची चल-अचल मालमत्ता विक्री अथवा भाडे तत्त्वावर देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. गेल्या आठ वर्षापासून कारखाना कधी सुरू होणार याकडे शेतकरी, कामगार व सभासदांचे लक्ष लागले होते. मागील महिन्यात प्रसिद्ध झालेली निविदा व त्यावर घेण्यात आलेले आक्षेप यामुळे चारही तालुक्यातील शेतकरी, सभासद व कामगारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते.

मात्र आता जाचक अटी-शर्ती वगळून फेरनिविदा करण्यात आली आहे. तरी वीस दिवसांचा वेळ वाया गेला असल्याने कारखाना दुरुस्तीचे काम लांबणीवर पडून गळीत हंगामाच्या तयारीला वेळ कमी मिळणार आहे. उशिरा का होईना कारखाना सुरू होत असल्याचा आनंद पंचक्रोशीतील शेतकर्‍यांमध्ये असून या टेंडरसाठी सर्व घटकांनी बँकेला व शासनाला सहकार्य करून कुठल्याही अडचणी आणू नये अशी अपेक्षा शेतकरी सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.

अशा आहेत अटी-शर्ती

निविदा घेणार यांनी प्रथम बयाणा रक्कम रुपये 25 लाख जमा करायचे असून ज्यांची निविदा अंतिम होईल त्यांनी 30 दिवसाच्या आत 2 कोटी 25 लाख अनामत भरावयाची आहे. यात 25 लाख बयाणा रक्कम जमा करून 2 कोटी 50 लाख रुपये अनामत राहणार आहे. कारखाना भाडेतत्वावर घेणार्‍या कंपनीला पहिल्या दोन वर्षी 50 लाख रुपये भाडे, तिसर्‍या ते पाचव्या वर्षापर्यंत एक कोटी रुपये भाडे, चौथ्या व पाचव्या वर्षी 2 कोटी रुपये भाडे, तर सहावर्षे ते पुढील कालावधीसाठी प्रतिवर्षी 3 कोटी रुपये भाडे आकारणी होणार आहे.

याशिवाय प्रत्येक वर्षाच्या भाड्यात जीएसटी चा वेगळा समावेश राहणार आहे. तसेच प्रतिवर्षी गाळप होणार्‍या उसाच्या प्रति मेट्रिक टनावर रुपये 100 टॅगिंग रूपाने जमा करावे लागतील. तसेच टॅगिंग मधून जमा होणार्‍या रक्कमे मधून पहिले पाच वर्ष 50 टक्के बँकेच्या कर्जासाठी तर 50 टक्के रक्कम कारखान्याची इतर देणे देण्यासाठी असेल. सहा ते दहा वर्षासाठी 60 टक्के रक्कम बँक कर्ज व 40 टक्के इतर देणे देणेकामी तर 11 ते 25 व्या वर्षी मध्ये 70 टक्के बँक कर्ज व 30 टक्के इतर देणी देणेसाठी रहाणार आहे. कारखाना 2021-22 ते 2045-46 असा 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.