नाशिक | Nashik

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली असून, २१ डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. करोनाकाळात प्रवेशासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी कागदपत्रे मिळण्यात अडचण झाल्याने डिसेंबरमध्येही आरटीईच्या राज्यात हजारो जागा रिक्त आहेत.

जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण ४४७ शाळा असून, त्याअंतर्गत पाच हजार ५३७ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी १७ हजार ६३० अर्ज आतापर्यंत आले असून, त्यांपैकी पाच हजार ३०७ जणांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाला.

मात्र त्यातील तीन हजार ६८४ जणांनी आतापर्यंत आरटीईमधून प्रवेश पूर्ण केला आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी मात्र शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला. यापूर्वी पडताळणी समितीकडे होणारे प्रवेश शाळास्तरावर पूर्ण करण्यात आल्याने पालकांची सोय झाली.

प्रवेशावेळी एकावेळी पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कमी झाली. यंदा आरटीई प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत सरासरी ७५ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले होते.

आरटीई प्रवेशाची राज्यातील स्थिती

एकूण शाळा -९,३३१

एकूण प्रवेशक्षमता -१,१५,४७७

एकूण अर्जसंख्या -२,९१,३६८

निवड झालेले -१,३६,२५७

एकूण प्रवेश पूर्ण - ८४, ५१७