नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन (प्रत्यक्ष) परीक्षेच्या निकालातील त्रुटी समोर आल्या आहेत. परीक्षा देऊनही 18 हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण असे नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे विद्यापीठाकडून आठ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येत असून दहा हजार 33 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

विद्यापीठाकडून अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. आता परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत असताना निकालातील गोंधळ आणि चुका समोर येऊ लागल्या आहेत.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित असल्याचा शेरा, तसेच काही विषयांमध्ये शून्य गुण असणे असे प्रकार झाल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले,‘ निकालात त्रुटी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यावर विद्यापीठाने स्वत:हूनच निकालाची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत निकालाबाबत 134 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.