
नाशिक । वैभव कातकाडे Nashik
करोनामुळे दगावलेल्यांच्या ( Death Due to Corona ) नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान ( Compensesation )देण्यात येत आहे याची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक नाशिकच्या दोन दिवसीय दौर्यावर आहे. त्यांनी याबाबत माहिती घेत सर्व बाबी समजून घेतल्या आहेत. मजूर झालेले आणि तक्रार निवारण केंद्राने मान्यता दिलेल्या अर्जांची फेरतपासणी हे द्विसदस्यीय पथक करत आहे.
दरम्यान, काल (दि.27) रोजी जिल्ह्यात दाखल झालेल्या द्विसदस्यीय पथकाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यातर्फे जिल्हा रुग्णालयात एक सेट अप बसविण्यात आला असून त्याद्वारे हि फेरतपासणी होत आहे. मालेगाव तालुक्यातील सानुग्रहाबाबत जे अर्ज मंजूर झाले होते त्यांची पूर्ण फेरतपासणी दुपारपर्यंत पूर्ण झाली. त्यानंतर जिल्ह्यातील तपासणी सुरु झाली आहे. शुक्रवार (दि.29) तारखेपर्यंत ही तपासणी सुरु राहणार आहे.
करोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना देण्यात येणार्या 50 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे जिल्ह्यात जवळपास 98 टक्के वाटप पूर्ण झाले असून, मदतीची रक्कम वारसांच्या खात्यात जमा झालेली आहे. नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत 12 हजारपेक्षा जास्त वारसांना या योजनेतून दिलासा मिळाला आहे. कुणीही या योजनेतून वंचित राहू नये यासाठी अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न समितीकडून केला जात आहे.
देशावर ओढावलेल्या करोनाच्या आपत्तीमुळे मृत झालेल्या रुग्णांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिले होते. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाला आदेशित करून आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करोना मृत वारसांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेसाठी जवळपास 15 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले होते.