
मालेगाव । प्रतिनिधी
थकीत एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांच्या आदेशावरून तसेच जिल्हाधिकार्यांच्या सुचनेवरून रावळगाव येथील एस.जे. शुगर साखर कारखान्याच्या 23 कोटी 71 लाख रूपयांची साखर तसेच 35 लाखांची कच्ची साखर मॉलसेस व बॅग असा सुमारे 24 कोटी 82 लाख 11 हजार रूपयांचा ऐवज असलेले गोदाम तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने सील केले आहे.
या कारवाईमुळे ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांच्या थकित रक्कम मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. रावळगाव एस.जे. शुगर साखर कारखान्याकडे 2020-21 मधील गळीत हंगामामधील एफआरपीपोटी 17 कोटी 98 लाख 76 हजार रुपये थकीत आहे. साखर कारखान्यांच्या ऊस नियंत्रण आदेशान्वये 1966 च्या कलम 3/3 मधील तरतुदीनुसार गाळप केलेल्या उसाचे 14 दिवसात किमान एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा करणे बंधनकारक असतांना एस.जे. शुगरने सदरची रक्कम थकवली आहे.
या थकित रक्कमेबाबत साखर संचालनालयाने कारखान्याला नोटीस देखील बजावली होती. या संदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नाशिक येथील सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षकांना कारवाईचे आदेश दिले होते. लेखा परिक्षकांनी जिल्हाधिकार्यांना कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची सुचना केली होती.
यानुसार जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून तहसीलदार राजपूत यांनी मंडल अधिकारी दौलत गणोरे, तलाठी चंद्रकांत महाले आदींच्या पथकाने कारखान्यावर जावून साखर गोदामास सील करण्याची कारवाई केली. शेकडो शेतकर्यांनी गाळपासाठी रावळगावला ऊस दिला होता. मात्र गाळप होवून देखील उसाचे पेमेंट मिळाले नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. साखर आयुक्तांच्या कारवाईने शेतकर्यांना पैसे मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.