रेशन दुकानदारांचा संप तूर्तास स्थगित

समीर भुजबळांची मध्यस्थी : अन्नधान्यवाटप आजपासून सुरु
रेशन दुकान
रेशन दुकान

नाशिक । Nashik

विमा सुरक्षा कवच व इतर मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी केलेला संप माजी खासदार समीर भुजबळ यांनी मध्यस्थी केल्यानंतर मागे घेण्याचा निर्णय जिल्ह्यातील रास्त भाव रेशन दुकानदार संघटनेने केला आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतर अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे बुधवारपासून (दि.१२) अन्नधान्य वाटप केले जाणार असल्याची माहिती संघटनेने दिली. या निर्णयामुळे गोरगरिब जनतेला मोठा फायदा होणार आहे.

रेशन दुकानदारांना ५० लाखांचे विमा कवच द्या, करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता विना थम्प अन्नधान्य वाटपास परवानगी द्याअशी मागणी करत रास्त भाव रेशन दुकानदार संघटनेने १ मे पासून संप पुकारला होता. ५५ हजार रेशन दुकानदार संपावर गेले. मंत्रीमंडळाची याबाबत बैठक होणार होती व संपावर तोडगा निघण्याची शक्यता होती. या संपामुळे प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत मे व जुनसाठी वाटप करण्यात येणार्‍या मोफत पाच किलो अन्नधान्याचे वाटप थांबले होते.त्याचा सर्वाधिक फटका हा गोरगरिबांना बसला होता. राज्यात ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदार असून त्यांनी करोना संकट काळात शासनाची मोफत धान्य योजना रेशनकार्डधारकांपर्यंत पोहचविली. शासानकडून कोणतेही विमा कवच, करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत न मिळताही रेशन दुकानदारांनी त्याचे कर्तव्य बजावत सहकार्याची भूमिका घेतली. मध्यंतरी शासनाने रेशन दुकानधारकांना विमा कवच देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अद्याप हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. या मागणीबरोबरच स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा किंवा फुड प्रोग्राम अंतर्गत २७० रुपये प्रती क्विंटल प्रस्तावित केल्यप्रमाणे कमीशन मार्जीन देण्यात यावे, रेशनदुकानदारांना विमा संरक्षण व मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरी व राजस्थान सरकारप्रमाणे ५० लाखांची आर्थिक मदत घोषित करावी, धान्य वाटप करतांना प्रतीक्विंटल एक ते दीड किलो येणारी घट ग्राह्य धरण्यात यावी, शासकीय धान्य गुदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना ५० किलो ५९० ग्रॅम वजनाचे कट्टे देण्यात यावेत, दुकानदारांना दुकानभाडे, वीजबील, स्टेशनरी खर्च देण्यात यावा, ई-पॉझ मशीन बदलून मिळाव्यात, मोफत धान्य वितरणाचे राहीलेले कमीशन देण्यात यावे, दुकानदारांनी दिलेली हमालीची रक्कम वाहतूक कंत्राटदाराकडून देयकातून वसूल करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून लाॅकडाऊन वाढविण्यात आला आहे. गोरगरिबांना या संकटात रेशनविना उपाशी रहावे लागले असते. ते बघता माजी खासदार समीर भुजबळ यांनी मध्यस्थी केली. लॉकडाऊन शिथील झाल्या नंतर बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्हयातील दुकानदारांनी संप मागे घेतला आहे.
प्रतिक्रियासंप मागे घेण्यात आला असून आजपासून अन्नधान्याचे वाटप लाभार्थ्यांना केले जाईल.लॉक डाऊनच्या सर्व नियमांचे पालन करून धान्य वितर न करावे अशा सूचना दुकानदारांना दिल्या आहेत.- निवृत्ती कापसे, जिल्हा अध्यक्ष

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com