डांगसौंंदाणेत शेतकर्‍यांचा रास्ता रोको

डांगसौंंदाणेत शेतकर्‍यांचा रास्ता रोको

डांगसौदाणे । वार्ताहर Dangsoundane

तब्बल दीड महिना उलटूनही गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना कुठलीही मदत जाहीर झाली नसल्याने आज डांगसौंदाणे पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी आक्रमक होत बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील केळझर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध केला.

डांगसौंदाणे परिसरात 9 ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने या भागातील शेती पूर्णपणे नेस्तनाबूत झाली आहे.या भागातील प्रमुख पीक असलेले उन्हाळ कांदा हा या गारपिटीने संपूर्णपणे जमिनीतच सडला तर टोमॅटो ,मिरची पीक भुईसपाट झाल्याने या भागातील शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गत 70 वर्षात अशी गारपीट झाली नव्हती, या गारपीटीची दखल स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांनी घेत अयोध्या दौरा आटोपत थेट बागलाणच्या शेती बांधावर येऊन या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

मात्र पंचनामेचा सोपस्कार पूर्ण होऊन महिना उलटला तरीही शासनाने अद्याप पर्यंत शेतकर्‍याना कुठलीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. तब्बल दीड महिना उलटून ही नुकसान भरपाई मिळत नसल्याने आज सकाळी 11 वाजता डांगसौंदाणेसह पंचक्रोशीतील निकवेल, चाफ्याचा पाडे, दहिंदुले, भिलदर, तळवाडे, साकोडे आदी गावातील शेतकर्‍यांनी आक्रमक होत राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले यावेळी 'भीक नको हवे घामाचे दाम 'असे म्हणत राज्य शासनाला जाब विचारण्याची वेळ आल्याचे बोलून दाखविले.

यावेळी शेतकरी गोविंद चिंचोरे यांनी शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण असून शेतकरी राजा आता राजा राहिला नसून त्याला या राज्यकर्त्यांनी भिकारी केले आहे. आत्ताच्या शेतकरी नेत्यांचा बेगडीपणा असून शेतकरी नेते राजकारणी झाले आहेत. स्वर्गीय शरद जोशी सोडले तर या देशात शेतकर्‍यांची बाजू मांडणारा कोणीही नेता जन्माला आलेला नसल्याची खंत यावेळी बोलताना व्यक्त केली शेतमालाला कवडीमोल दर मिळत असताना राज्य सरकार आपले सरकार वाचविण्याच्या नादात शेतकरी वर्गाला विसरल्याची टीका युवा शेतकरी संजय सोनवणे यांनी केली.

पिक विम्याच्या नावाने कोट्यवधी रुपये विमा कंपनीना जातात मात्र शेतकर्‍यांच्या हातात काही एक पडत नाही हे सरकार म्हणते आम्ही शेतकर्‍यांचे सरकार आहोत मग यांनी शेतकर्‍यांसाठी केले तरी काय ?असा सवाल सोनवणे यांनी विचारत हे आंदोलन यापुढेही तीव्र करण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले एकीकडे शेतकरी जेसीबीने आपला कांदा उकिरड्यावर फेकत आहे तर दुसरीकडे स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून शेतीची नांगरटी करीत असल्याचे चित्र आहे.

शासनाने तातडीने नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी सोनवणे यांनी केली ङ्गङ्ग आंदोलनात ग्रा,प ,सदस्य पंढरीनाथ बोरसे, गोविंदा सुलक्षण आदींची भाषणे झाली , यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे बाजार समितीचे संचालक शेतकरी नेते संजय सोनवणे यांनी आक्रमक भूमिका मांडत सरकार कोणाचीही असो कुठल्याही पक्षाची असो आपल्याला त्याच्याशी घेणे देणे नाही मात्र शेतकरी हा मदतीपासून वंचित राहिला नाही पाहिजे त्याला त्याच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींना सुद्धा जाब विचारण्याची वेळ आली तरी चालेल मात्र शेतकर्‍यांसाठी केव्हाही आणि कुठेही आंदोलन करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे शेतकरी एकजूट राहिला तरच शासनालाही गांभीर्य कळेल अन्यथा शेतकर्‍याला कोणी वाली नसल्याचे सांगत येत्या शुक्रवार पर्यन्त शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली नाही तर प्रसंगी बागलाण तहसील समोर बहुसंख्य शेतकर्‍यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येईल यासाठी सर्व शेतकर्‍यांनी एकजुटीने लढा देण्याची वेळ असल्याचे संजय सोनवणे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना सांगितले.

यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच सोसायटी सभापती,उपसभापती, ग्रामपंचायत सदस्य, संचालक,आदींसह बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सटाणा पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राऊत यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शासनाचा निषेध

आंदोलन सुरू असताना राज्यमार्ग 19 वर वाहतुक कोंडी; वाहनांच्या दुतर्फा लाईन लागल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महसूल प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना दिलेली असताना महसूलचा कुठलाही अधिकारी अथवा कर्मचारी शेतकर्‍यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आंदोलन ठिकाणी न आल्याने शेतकर्‍यांनी महसूल प्रशासनाचा केला निषेध केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com