दिंडोरीत चार तास रास्ता रोको

वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी
दिंडोरीत चार तास रास्ता रोको

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता बोरकर यांनी शेतकर्‍याशी वापरलेल्या अर्वाच्य भाषेत शैलीने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी चार तास रास्ता रोको करुन बोरकर यांच्या निलंबनाची मागणी केली.

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी निवृत्ती बोराडे यांच्यात व दिंडोरीचे शाखा उपअभियंता बोरकर यांच्यात विज जोडणीवरुन वाद झाला. या वादाचे पर्यवसन भ्रमणध्वनीवरच शिवीगाळीत झाले. यावेळी बोरकर यांनी बोराडे यांना शिविगाळ केली. या सर्व बोलाचालीचे रेकार्ड बोराडे यांनी करुन ठेवले. संध्याकाळी बोरकर यांनीही सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार दिंडोरी पोलिस ठाण्यात दिली.

बोराडे यांनीही संभाषणाची क्लिप सर्वत्र व्हायरल केली. या पार्श्वभमूीवर रविवारी सकाळी 10 वाजता शेतकरी व सर्वपक्षिय नेते रस्त्यावर उतरले. या सर्वांनी घोषणाबाजी केली. जोपर्यत बोरकर यांना निलंबित केले जात नाही तोपर्यत रस्तारोको मागे घेतला जाणार नाही अशी भुमिका सर्वपक्षिय नेत्यांनी घेतली. यावेळी तहसिलदार पंकज पवार यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली व त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु आंदोंलन कर्ते जुमानले नाही.

त्यानंतर अधिक्षक अभियंता प्रविण गरोली, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. निलंबनाचा प्रस्ताव देणार असल्याचे व बदलीचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. काँग्रेसचे नेते सुनील आव्हाड यांनी तहसीलदार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भ्रमनध्वनीवर चर्चा घडवून आणली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल आव्हाड, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी जि.प. गटनेते प्रवीण जाधव, प्रकाश वडजे, अनिल देशमुख, प्रमोद देशमुख, डॉ. योगेश गोसावी, प्रा. संदीप जगताप, दिलीप जाधव, रा. कॉ. नेते नरेश देशमुख, रणजित देशमुख, राकेश शिंदे, सचिन देशमुख,

छावा संघटनेचे निलेश शिंदे, संतोष मुरकूटे, गंगाधर निखाडे, शाम हिरे, कैलास पाटील, तुकाराम जोंधळे, विनायक शिंदे, भाऊसाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमोद मुळाणे, राजेंद्र उफाडे, प्रभाकर वडजे, प्रकाश आहेर, पोपट चौघूले, सचिन आव्हाड, गुलाब जाधव, सुजित मुरकूटे, प्रितम देशमुख, लखन पिंगळे आदी उपस्थित होते.

दिंडोरी शहरात आणि तालुक्यात शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांना माहीती असून शेतकर्‍यांना त्रास दिला जातो. शेतकर्‍यांच्या भावनांशी कुणीही खेळू नये. यापुढे शेतकर्‍यांना आणि जनतेला त्रास देणार्‍या अधिकार्‍यांना धडा शिकवला जाईल.

रामदास चारोस्कर, माजी आमदार, दिंडोरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com