रासाकाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने : भुजबळ

रासाकाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने : भुजबळ

पालखेड मिरचीचे। वार्ताहर

कर्मविरांनी दूरदृष्टी ठेवून साखर कारखाने ( Sugar Factories ) सुरू केले तर आमदार दिलीप बनकरांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या नेहमीच प्रगतीपथावर सुरू आहेत. त्यांनी चालविण्यास घेतलेला रासाका देखील प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकील. अडचणी प्रत्येक क्षेत्रात येतात मात्र त्यावर मात करून पुढे जाणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र कुणापुढे झुकणार नाही आणि वाकणार देखील नाही. रासाकासाठी शेतकर्‍यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी असेही राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal)यांनी म्हटले आहे.

स्व.अशोकराव बनकर सहकारी पतसंस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या (Karmaveer Kakasaheb Vagh Cooperative Sugar Factory) 40 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी भुजबळ बोलत होते. आज आपल्यासमोर बेकारी, महागाई, अतिवृष्टी यासारखे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले आहेत. वेदांता, फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस प्रकल्प गुजरातला पळविला गेला. केंद्राला सर्वाधिक टॅक्स महाराष्ट्रातून जातो मात्र त्या तुलनेत पैसे मिळत नाहीत. हक्काचे रोजगार जात आहे.

ड्रायपोर्ट होणार होते ते गुजरातला गेले तर आश्चर्य वाटू नये. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. आरक्षण घेवूनही तरूणांना नोकर्‍या मिळत नाही. अतिवृष्टीमुळे शेतकरी मरतोय तो हतबल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे राहिले पाहिजे. दिलीप बनकरांनी स्थापन केलेल्या संस्था कधी फेल गेल्या नाही त्यांचा उत्कर्ष झाला आहे. आता दिवाळी संपली तरी या सरकारचा ‘आनंदाचा शिधा’ अजून यायचा आहे. फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस प्रकल्प देखील गुजरातला गेला. जेव्हा टाटाने एअरबसचा प्रकल्प हाती घेतला तेव्हा सर्वात आधी मी टाटांना पत्र पाठविले होते की तुम्ही नाशिकला हा प्रकल्प द्यावा. एच.ए.एल मध्ये तुम्हाला सर्व सुविधा देतो. त्यावेळी सर्व ठरले पण ऐनवेळी हा प्रकल्प देखील गेला.

एक-एक उद्योग राज्यातून चालले आहे. मात्र या सरकारचे काही चालत नाही. कारण त्यांचेपुढे महाशक्ती आहे. मुंबईचे किती उद्योग गुजरातला गेले त्यामुळे हा महाराष्ट्र कमकुवत करू नका. तसेच संकटात महाराष्ट्र कधी डगमगला नाही. आता म्हणे नोटांवर फोटो छापायचे. छापा कोणाचेही फोटो छापा पण त्या नोटा गरिबापर्यंत तर येवू द्या. या सरकारने आम्ही मंजूर केलेली अनेक कामे रद्द केली आहेत. आज सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे आगामी काळात यात निश्चित बदल होणार आहे. दिलीप बनकरांनी हा कारखाना चालविण्यास घेतला तेव्हा शेतकर्‍यांनी देखील काही दिवस श्रद्धा आणि सबुरी ठेवावी असा सल्लाही भुजबळांनी शेतकर्‍यांना दिला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, भुजबळ बांधकाम मंत्री होते तेव्हा पुल झाले, रस्ते झाले. मात्र अद्यापही काही रस्ते राहिले पण सांगायचे कोणाला.

अतिवृष्टीमुळे तर द्राक्षबागांची अवस्था वाईट आहे. सर्वच पीके वाया गेली मात्र अद्याप पंचनामे होत नाही. कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे म्हणाले की, आज शेतकर्‍यांना फक्त ऊसाचाच आधार उरला आहे. त्याच ऊसाचा भाव केंद्र सरकार ठरवेल. साखरेची निर्यात मोठ्या प्रमाणात झाली तर साखरेला चांगले दिवस येतील असे मनोगत व्यक्त केले. आपल्या प्रास्ताविकात आमदार दिलीप बनकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित दादा पवार यांनी शब्द दिला म्हणून आपण त्यातून उतराई होण्यासाठी व शेतकर्‍यांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी हा कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी प्रयत्न केले. संघर्ष करणे अन् संयम ठेवणे हे मी भुजबळ यांचेकडून शिकलो.

रासाका प्रमाणे निसाका चालू व्हावा यासाठी पिंपळगाव बाजार समितीच्या माध्यमातून टेंडर भरले होते. मात्र निवडणूक लागल्याने त्यात अडचणी आल्या. ज्या दिवशी निसाकाची मोळी पडेल तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल. या तालुक्यात गोदाकाठ भागात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे तर उत्तरपूर्व भागात द्राक्षबागा सर्वाधिक आहेत. मात्र केंद्र सरकारने फक्त महाराष्ट्रातीलच कोल्ड स्टोअरेजचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे ते पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करावे. नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या वाढीव 10 गेट बसविण्याला मंजुरी दिली असून त्यासाठी 110 कोटी रू. लागणार आहे. परंतु आत्ताच्या सरकारने या सर्व प्रकल्पांना स्थगिती दिली आहे असेही बनकर म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, सुहास कांदे, आमदार सुधीर तांबे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, मविप्र सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चांगदेवराव होळकर, तानाजी बनकर, माणिकराव बोरस्ते, सुरेशबाबा पाटील, डी.के. जगताप, पंढरीनाथ थोरे, अशोक शहा, सोेहनलाल भंडारी, अ‍ॅड.रवींद्र पगार, राजेंद्र डोखळे, राजाराम शेलार, दिगंबर गिते, दत्तात्रय पाटील, दत्तात्रय डुकरे, विश्वास मोरे, भागवत बोरस्ते, सिद्धार्थ वनारसे, राजेंद्र मोगल, हरिश्चंद्र भवर, शिवाजी ढेपले, अजिंक्य वाघ, मधूकर शेलार, सुभाष कराड आदींसह अशोकराव बनकर पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. रामभाऊ माळोदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com