नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी हरिश्चंद्र गडावर ‘सोनसरी’ आणि ‘पिंदा श्रीरंगी’ या दुर्मिळ वनस्पतींचा शोध लावला आहे. प्रा. डॉ. विनोदकुमार गोसावी यांनी हे संशोधन केले. त्यांना डॉ. शरद कांबळे, डॉ. अरुण चांदोरे, नीलेश माधव, देवीदास बोरुडे यांचे सहकार्य आणि डॉ. एस. आर. यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

सोनसरी तथा विकोआ गोखलेइ

सोनसरी हे या वनस्पतीचे बोलीभाषेतील नाव आहे. ही वनस्पती सूर्यफूल कुळातील आहे. ही सह्याद्रीच्या पठारावर वाढते. हिरवी पाने आणि गर्द पिवळ्या रंगाची फुले असतात. दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान ती फुलते. सोनसरीच्या जगात 14 प्रजाती आढळतात. त्यातील भारतात 4 प्रजाती सापडतात.

आता ही पाचवी प्रजाती सापडली आहे. तिची माहिती न्यूझीलंड येथून प्रकाशित होणार्या जागतिक दर्जाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. गोसावी यांच्या चमूने या फूल वनपस्तीचे ‘विकोआ गोखलेइ’ असे नामकरण केले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेला 100 वर्षांपेक्षा जुना इतिहास आहे. संस्थेच्या सन्मानार्थ आपण वनस्पतीला हे नाव दिले, असे डॉ. विनोद गोसावी यांनी सांगितले.

पिंदा श्रीरंगी

काही दिवसांपूर्वी त्यांनी हरिश्चंद्र गडावरच ‘पिंदा श्रीरंगी’ ही दुर्मिळ वनस्पती शोधली. ही फूलवनस्पती कोथिंबीर कुळातील असून तिचा गण ‘पिंदा’ हा आहे. या गणात याआधी फक्त ‘पिंदा कोंकनेसिस’ ही वनस्पती होती. जी सह्याद्रीत आढळते.

आता या दुसर्या प्रजातीची नोंद झाली आहे. स्वीडन येथून प्रकाशित होणार्या एका जागतिक दर्जाच्या नियतकालिकात तिची माहिती प्रसिद्ध झाली आहे. या दोन्ही वनस्पतींचे पुढील संशोधन केले जाणार आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.