
नाशिक । वैशाली शहाणे ( सोनार)
आज दि. 5 ते 12 नोव्हेंबर 2020 या दरम्यान राज्यात पक्षी सप्ताह साजरा होत आहे. त्यानिमित्त आपण पुढचे सात दिवस भेटणार आहोत काही पक्षीमित्रांना आणि जाणून घेणार आहोत माहिती पक्षांविषयीची.
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली आणि ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली या दोन ऋषितुल्य व्यक्तीमत्वांना भेटण्याची, त्यांच्याबरोबर काही काळ व्यतीत करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. डॉ. सलीम अली यांच्यामुळेच माझा पक्ष्यांच्या जगात प्रवेश झाला...
आजपासून 12 तारखेपर्यंत राज्यात प्रथमच पक्षी सप्ताह साजरा होत आहे. आज मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि 12 तारखेला ज्येष्ठ पक्षी निरीक्षक डॉ. सलीम अली यांची जयंती. या दोघांच्या भेटीला नाशिकचे ज्येष्ठ पक्षी निरीक्षक दत्ता उगावकर यांनी मदेशदूतफशी बोलताना उजाळा दिला.
चितमपल्ली नाशिकला आले होते.
चितमपल्ली यांची आणि माझी भेट पक्षी मित्र संमलेनाच्या निमित्ताने झाली. नाशिकला सहावे पक्षी मित्र संमेलन घ्यायचे आणि त्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. चितमपल्ली यांना बोलवायचे सर्वानुमते ठरले होते. त्याचे आमंत्रण घेऊन मी नागपूरला गेलो होतो. ती त्यांची आणि मी माझी पहिली भेट. त्या संमेलनासाठी ते 3 दिवस नाशिकला आले होते. त्यांना नांदुरमाध्यमेश्वरही दाखवले. त्यांची एक आठवण सांगतो. नांदुरमाध्यमेश्वर धरणाच्या कालव्याच्या कडेला रात्र बगळ्यांची (नाईट हेरॉन्स) यांची घरटी असतात. ती घरटी दाखवण्यासाठी आम्ही त्यांना तेव्हा घेऊन गेलो होतो. गप्पा मारता मारता कावळ्यांची घरटी आणि पावसाचे नाते त्यांनी उलगडून सांगितले होते आणि पक्षांचा असा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा दिली होती.
सलीम अली 82 साली नांदुरमाध्यमेश्वरला आले होते..
1982 सालची गोष्ट आहे. त्यावर्षी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री या संस्थेचे शास्त्रज्ञ आणि डॉ. सलीम अली नांदूरमधमेश्वरला तीन दिवस आले होते. पक्षांना कडी घालण्याचा कॅम्प त्यांनी घेतला होता. नांदूरमध्यमेश्वरचा पक्षी समृद्ध परिसर बघून त्यांनी म हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहेफ असे उद्गार काढले होते. मी तेव्हा पक्षी निरीक्षण करत नव्हतो. पण एवढा मोठा माणूस आपल्याकडे आला या भावनेने मी काही मित्रांना घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. मग आम्ही पुढचे तीन दिवस त्यांच्याबरोबरच राहिलो.
ते 85 वर्षांचे तरुण होते..!
तेव्हा डॉ. अली 85-86 वर्षांचे होते पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. ते इतके झपझप चालायचे की बरोबरच्या सर्वाना त्यांच्यामागे पळावे लागायचे. नांदुरमाध्यमेश्वर धरणाचा खालचा परिसर खडकाळ आहे. त्याच्या मध्यभागी जिथे कादवा आणि गोदेचा संगम होतो तिथे नांदुरमाध्यमेश्वराचे जुने मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक छोटासा डोह आणि खडक-कपारींची रांग आहे. तिथे विशिष्ट काळात पाकोळ्या 200-300 घरटी करतात. ती मातीची आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. तेव्हा या मंदिरापर्यंत जाण्यासाठी मोठीच कसरत करावी लागायची. तरीही त्या घरट्यांची फोटोग्राफी आणि शूटिंग करण्यासाठी सलीम अली तिथे गेले होते.
तेव्हापासून मी पक्षी निरीक्षणाचा वसा घेतला!
85-86 वर्षांच्या अलींची ती धडपड मला स्पर्शून गेली. त्यांचा माझ्यावर विलक्षण प्रभाव पडला. तेव्हापासून मी निसर्गप्रेमाचा आणि पक्षी निरीक्षणाचा वसा घेतला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री या संस्थेचा सद्स्य झालो. डॉ. विनय ठकार, दिगंबर गाडगीळ मी असे पक्षीमित्र एकत्र आलो. नांदुरमाध्यमेश्वर परिसरात तेव्हा पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात अवैध शिकार व्हायची. ती थांबवण्यासाठी आम्ही मोहीम हाती घेतली होती. त्यात आम्हाला यश आले. मग आम्ही पक्षांच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली. त्यासाठीचा अभ्यास केला. हाच परिसर विशिष्ट का मानला जातो याचाही अभ्यास केला. 86 साली सर्व प्रकारच्या पक्ष्यांची चेकलिस्ट प्रसिद्ध केली आणि नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.