प्रतिबंधित क्षेत्रात ‘रॅपिड टेस्ट’
नाशिक

प्रतिबंधित क्षेत्रात ‘रॅपिड टेस्ट’

तपासणीत दोन रुग्ण पॉझिटिव्ह

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

प्रभाग २५ मध्ये घरोघरी पाहणी, तपासणी व उपचार या अभियानाची सुरुवात नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी बैठक घेऊन व नंतर आपल्या परिसरातील खासगी डॉक्टरांच्या मदतीने तपासणी मोहीम सुरू केली. यामध्ये हजारावर नागरिकांची घरी जाऊन तपासणी करण्यात आली. यात ताप, ऑक्सिजन लेव्हल व गरज असेल तेथे प्रतिकार क्षमता वाढवण्याच्या गोळ्या देण्यात आल्या. यामध्ये विशेष बाब म्हणजे रॅपिड टेस्ट करण्यात आली.

या तपासणीत दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे खर्‍या अर्थाने ही मोहीम यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले. या मोहिमेप्रसंगी राकेश ढोमसे, सविता वसावे, सुनीता भोये, मनीषा शिरसाठ, मनपा डॉ. दीपिका मोरे तसेच स्वप्निल गाडगे, प्रीतम जाधव, अनुप माळी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सलग दुसर्‍या दिवशी प्रभाग २५ चे नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षदा बडगुजर या नगरसेवक दाम्पत्याने परिसरातील शेकडो घरांना भेटी देत आरोग्याची तपासणी केली. यादरम्यान चार जण बाधित आढळून आले. त्यामुळे कालचे सहा व आजचे चार असे एकूण दहा जण या तपासणी मोहिमेत करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने या मोहिमेचा उद्देश सफल होताना दिसत आहे.

लोकप्रतिनिधी आमच्या दारापर्यंत आल्याने आमच्या मनातील करोनाची भीती नष्ट झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी खासगी व मनपाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com