
नाशिक | Nashik
शहरात विविध ठिकाणी रंगपंचमी (Rangpanchami) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ठिकठिकाणी डीजे, रेन शॉवरवर तरुणाई थिरकल्याचे दिसत आहे. तसेच पोलिसांनी (Police) रहाडीला परवानगी दिल्यामुळे जवळपास सर्वच मंडळ रहाडीत रंगपंचमी साजरी करतांना दिसत असून काहींनी गोदाघाटावर (Godaghat) गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे...
शहरात दरवर्षी एकूण चार ते पाच रहाडी रंगपंचमीला खुल्या केल्या जातात. यामध्ये शनी चौक, दिल्ली दरवाजा, तांबट गल्ली, तीवंधा चौक आणि दंडे हनुमान येथील राहाडींचा समावेश असून याठिकाणी आज रंगपंचमीच्या दिवशी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे. तसेच काहींनी रहाडीत उड्या घेत तर ज्यांना राहाडीत जाता आले नाही त्यांनी रहाडीतून रंगाच्या बादल्या आपल्या अंगावर ओतून घेत रंगपंचमीत ओलेचिंब होण्याचा आनंद लुटत आहेत.
तसेच महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रहाड महोत्सवातील आनंद द्विगुणीत केला. याशिवाय बच्चे कंपनीने देखील एकमेकांना रंग (Color) लावून रंगपंचमीचा आनंद लुटत आहे. तर दुसरीकडे रंगपंचमी आनंदात व शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.